॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -३४
शरभेश्वराचा वृतांत
आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोहोचलो. प्रवासात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत, त्यांच्या अलौकिक लीलांचे स्मरण करीत चाललो होतो. मार्गात आमचे आदरातिथ्य सुध्दा होत होते. कधी बैलगाडी मिळाली, कधी घोडा गाडी तर कांही वेळी पायीच चालावे लागले असा आमचा प्रवास झाला. आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळी कडून आदरातिथ्य स्वीकारणे चालूच होते. ही सर्व परोक्ष रूपाने श्रीपाद प्रभूंची लीलाच होती. त्या गावात पोहोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेले दिसले. त्याची बायको आणि मुले घरातच होती. ह्या ब्राह्मणाने एका ऋणदात्या (सावकार) कडून थोडे पैसे घेतले होते. ते पैसे तो परत करू शकला नाही. एके दिवशी त्या सावकाराने त्या ब्राह्मणास मार्गातच अडविले आणि त्याच्या भोवती कोळश्याने एक रिंगण करून त्याच्या रेघेच्या बाहेर येऊ नये असे बजाविले. किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपवीताची शपथ घेऊन सांग असे तो सावकार रागाने म्हणाला. मी आपले पैसे दोन आठवड्यात परत करीन असे ब्राह्मणाने आश्वासन दिले. परंतु पंधरा दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही. मुदत संपल्यावर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचे घर रस्त्यावर आणत होता. ब्राह्मण आणि त्याची मुले, पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते. गावातील सगळे लोक तमाशा सारखे बघत उभे होते. त्यांच्या पैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोडया दिवसाची मुदत द्या असे म्हणाला नाही.
श्रीपादांची भक्ति परिक्षा आणि भक्तांना तारणे
श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून कींव आली, परंतु कांही सहाय्य करावे तर हातात धन नाही. मी तर निर्धनच होतो. परंतु धैर्य करून म्हणालो, बाबा ! ह्या दुबळया ब्राह्मणावर दया करून अजून दोन महिन्याचा अवधि द्यावा. या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा कटाक्षाने त्याचे कष्ट दूर होतील. थोडा शांतचित्ताने विचार करा. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असे समजा. म्हणण्यास मी म्हणालो पण मनात अत्यंत भिती होती. त्यावर तो सावकार म्हणाला, ''बरे ! तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला दोन महिन्याचा आणखी अवधि देतो. माझे धन पूर्ण फिटेपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कोठे जाऊ नये. समजा माझे धन ठरलेल्या अवधीत याने परत नाही केले, तर त्याचे घर स्वाधिन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुध्दा न्यायालयात नेईन. तेंव्हा न्यायधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघेहि तितकेच पात्र ठराल.''
दिलेल्या अवधी मध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणे असंभवच वाटत होते. मागचा पुढचा विचार न करता, आपल्याला जमते किंवा नाही याचा विचार न करता अविवेकाने मी शब्द दिला. असे अविचाराने करता वागल्यामुळे माझा मलाच तिटकारा आला. यात श्रीपादांना दोष देणे बरोबर नव्हते. माझ्या बरोबर बिचाऱ्या धर्मगुप्ताला संकटात टाकले. हे आणखी एक पापच घडले. जिभेला नियंत्रण नसल्याने किती अनर्थ झाला याचे हे ज्वलंत उदाहरण होते. परंतु प्रभूंची लीला अपार आहे, तिला अंतच नाही. अशा परिस्थितीत प्रभूवरील भक्ति दृढ होते. किंवा मानव भक्तिरहित होतो. धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते. ते म्हणाले ''शंकरभट्टा ! घडलेल्या घटनेचा विचार करू नये झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत,वर्तमान आणि भविष्य हे सारेच प्रभूंची लीला आहे. आपले ब्रह्मलिखित जे आहे तेच होणार. ते तर चुकणारच नाही.'' ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्री झाला होता. तो आणि त्याच्या कुटंबातील सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांचेकडे पाहुणेच होतो म्हणून आम्ही सुध्दा उपाशीच रहावे. अशी दयनीय परिस्थिती होती. श्रीपादांच्या अनुग्रहाने रहाण्यास जागा मिळाली. त्यांचे आम्ही आभार मानत होतो. भूक, तहान, थकवा आला असताना तसेच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचे नामच एकमेव तरणोपाय आहे, असा दृढ विश्वास वाटत होता. आम्ही स्नान-संध्या करून, श्रीपादांचे नामस्मरण करण्याचे योजिले. त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास तेल वात सुध्दा नव्हती. आम्ही ''श्रीपादराजम् शरणं प्रपद्ये'' असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो, घरातील सारी मंडळी सुध्दा आमच्या बरोबर हा मंत्र उच्चारत होते. शेजारपाजारचे अबाल वृद्ध लोक जमा झाले आणि भक्तीभावाने नामस्मरण करू लागले. ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आला आहे. ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जवाबदारी त्याने घेतली आहे. तेवढया काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्यातरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवीशक्तीनेच ब्राह्मणाचे देणे देण्यासाठी सिध्द झालो आहे. असा त्यांचा समज झाला. मी फार मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला. त्या गावात शेतकऱ्यांना पैजा लावण्याचा नाद होता. त्या ब्राह्मणाचे ऋण हा फेडेल का नाही. या प्रश्नावर शेतकरी पैजा लावित होते. मी जर ब्राह्मणाचे कर्ज न फेडले तर आम्हाला न्यायालयात जावे लागणार होते. माझ्या बरोबर धर्मगुप्तपण संकटात सापडले. माझ्या कोरडया वाग्दानावर लोक पैज लावत होते. हा एक प्रकारचा जुगारच असल्या सारखा होता. त्याचे कारण म्हणजे माझा शब्दच होता. काय करावे ते काहीच कळत नव्हते अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला. माझी ती पण योग्यता नाही असे वाटले. मी एक मोठा ज्योतिष्य आहे, दैवीशक्ति संपन्न आहे असा प्रचार होतच होता. परंतु मी मात्र दिव्य, क्षणक्षणलीलाविहारि अशा श्रीपादांचे चरण कमलच मला या संकटातून तारतील या विश्वासाने बसलो होतो.''सत्यं विधातुं निजभृत्यभाषितं'' या नारदमुनिंनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचे स्मरण झाले. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात, त्या शब्दांना खरे करण्याची जबाबदारी नारायणांचीच असते. त्या ग्रामात शरभेश्वरशास्त्री या नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्र शास्त्रवेत्ता राहात होता. त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता त्याच्या आधाराने तो भूत,भविष्य,वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे. पैज लावलेले शेतकरी शरभेश्वराकडे आपल्या पैजेचे काय होईल याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रेतात्म्याने सांगितले, यानंतर पैजांनी आणखी जोर पकडला आणि शंभर शंभर वराहांची पैज लागली. शरभेश्वर शास्त्री मोठा की शंकरभट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते. शेवटी आम्हाला जुन्या वाडयात नेऊन न्यायालयात नेण्यास सिध्द केले गेले. त्या ब्राह्मणाला आशेला लावून निराश केले, धर्मगुप्तांना सुध्दा माझ्या बरोबर संकटात ढकलले. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचा गूढार्थ काय असेल मला काहीच समजेनासे झाले. माझे थोडेफार शिक्षण झाले होते परंतु कोणत्याहि प्रकारची अध्यात्मिक शक्ति नव्हती, ज्योतिष्यविद्या तर येतच नव्हती, जपतप, योगाभ्यास, कठीण असे नियमनिष्ठा यांचे ज्ञान तर अजिबातच नव्हते. श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एका कुतुहलाने मी संकल्प केला परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्या जवळ नव्हती. माझे यातून रक्षण करून माझा उध्दार करावा. अंतिम सर्व कांही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली. माझ्यात कधीहि नसलेले धैर्य त्यावेळी अचानक आले. जे होणार असेल ते होणारच परंतु श्रीपाद श्रीवल्लभ माझे यातून रक्षण करून मला तारतील असा दृढविश्वास माझ्या मनांत उत्पन्न झाला. शरभेश्वर शास्त्रीना एक बहीण होती. ती त्याच गावात रहात होती. तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्याचे, तिचा पती मरण पावला, आणि तिला वैधव्य प्राप्त झाले असे दिसले. तिने आपल्या भावाला म्हणजे शरभेश्वरशास्त्रींना स्वप्नाचे फळ विचारले. शरभेश्वराने आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले, हिचा पती देशांतरी गेलेला असताना. मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरले आणि सगळे द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले. ते ऐकून ती मोठ्याने पतीच्या निधनाचा विलाप करू लागली, आपल्या दैवाला दोष देऊ लागली. तेवढयात कांही लोक तिच्या घरी आले, तिला धीर देऊन सांगू लागले आपल्याच गावांत शंकरभट्ट या नावाचे महापंडित आलेले आहेत. त्यांना घटना घटिताचे ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्यदैवत आहेत त्यांच्याकडुन सत्य काय आहे ते जाणून घे. असा सल्ला त्यांनी तिला दिला. तिने स्वत:च्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित असल्याचे ऐकले नव्हते. शंकरभट्टा कडुन आशिर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. तिने आमच्या घरी येऊन ''भाऊ ! माझ्या मांगल्याचे रक्षण करा'' अशी मोठ्या दीनवाणीने प्रार्थना केली. ती ऐकुन माझ्या हृदयाचे पाणी-पाणी झाले. श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्याने प्राप्त केलेल्या मंत्राक्षता माझ्या जवळ थोडया आहेत असे मला आठवले . माझ्यात एका दिव्यस्फूर्तीचा आविर्भाव झाला, ह्या मंत्राक्षता साक्षात् श्रीपाद श्रीवल्लभां कडून मिळालेल्या असल्याने हिच्या मांगल्याची रक्षा शंभरटक्के होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला. मी त्या बाईला बोलावून म्हटले, ''बाई ! ह्या मंत्राक्षता तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव . तुझा पती थोडयाच दिवसांत तुला भेटेल. हेच सत्य आहे. त्रिवार सत्य आहे.'' हे वर्तमान कांही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रींना सांगितले, ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला. ''माझा पती सुखरूप घरी परत आल्यास, मी त्या गरीब ब्राह्मणांचे देणे तर देईनच शिवाय शंकरभट्टाला गुरु करून, श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण, आराधना करीन'' असा तिने संकल्प केला. तीन दिवस गेले. या तीन दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणुन दिला. ह्या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लाविली होती. मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसे सुध्दा त्यांना मिळणार होते. तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती. त्या मंत्राक्षतांच्या बळानेच आज माझे सौभाग्य टिकले अशी तिची खात्री झाली. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता. परंतु एका यवन मल्लाने मधे पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचे रक्षण केले होते. आहा ! श्रीपादांचा महिमा अगाध आहे. अमोघ आहे. शरभेश्वर शास्त्रीचा अहंकार नष्ट झाला. माझे ज्योतिष्य खरे ठरल्यामुळे आम्ही रहात असलेल्या घरच्या मालकांचे ऋण शरभेश्वर शास्त्रीने सारले आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी विनंती केली. त्याला आम्ही होकार दिला. शरभेश्वरशास्त्री म्हणाले. ''बाबा ! धूमावती देवी ही दशमहाविद्येतील एक आहे. तिचा मी उपासाक आहे. ती फार उग्रदेवता आहे. परंतु ती प्रसन्न झाली तर रोग, शोक या सर्व गोष्टींचा नाश करते. हिचा कोप झाला तर सर्व सुखांचा, सर्व कामनांचा ती नाश करते. ह्या देवीला शरण गेल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो. तिला राग आला तर उपास, भांडणे, दारिद्रय वगैरे येतात. माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे. करणी केल्याने त्रस्त जनांचा उध्दार करण्यास ह्या मातेची उपासना अनिवार्य असते. कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली. परंतु थोडया दिवसाने माझ्यात धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो. हे मातेला आवडले नाही. याच कळात माझा एका बलशाली प्रेतात्म्याशी संबंध स्थापित झाला. त्याच्या साह्याने भूत, भविष्य, वर्तमान काळाचे कथन करण्याची शक्ति मला लाभली. प्रेतात्म्याची उपासना करूच नये. उपासना केलीच तर त्याच्या शक्तिमुळे मिळालेले धन, प्रजासेवेसाठी, गरिबांना, निर्धनाना दान द्यावे. तसे केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन रहातो. असे न केल्यास, तो प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो. एवढेच नव्हे तर जीवास सुध्दा धोका असतो. स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्यराशींचा क्षय होतो. मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो. त्यातून बाहेर पडणे सोपे नसते. मी अविवेकाने धनार्जन केले आणि नेहमी स्वार्थच पहात होतो. त्यामुळेच त्या प्रेतात्म्याने चुकीचे भविष्य कथून मला संकटात टाकले आणि माझा अपमान पण झाला. आज पासून तुम्हीच माझे गुरु आहात, कृपा करून मला आपला शिष्य म्हणून स्विकारावे ही नम्र विनंती.'' त्यावर मी म्हणालो, ''बाबा ! या प्रपंचाचे, या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्रीवल्लभांनाच आहे. त्यांच्या शिवाय दुसरे गुरु कोणीही नाही. मी अहंकाराने जर गुरुत्व पत्करले तर तुझ्या अपमानापेक्षा आणखी दुसरे काही मला भोगावे लागेल. आम्ही कुरुगड्डीहून येते वेळी दशमहाविद्यांचे संक्षिप्त वर्णन श्रीपादांनी केले, बाकी उरलेले ते योग्य वेळी सांगणार आहेत. दशमहाविद्येमधील कालिबद्दल, धुमावति बद्दल त्यांनी आम्हाला सांगितलेच आहे. बाबा ! मला तू गुरु करू नकोस. श्रीपादांना, भक्तांना संकटात टाकणे आणि त्यातून सोडविणे म्हणजे एका चमत्कारासारखेच वाटते. सदा सर्वदा श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इह-परलोक साधन आहे.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"