Wednesday, April 24, 2019

अंत:करणापासून त्यांनी हांक मारली "स्वामी sss! "

गाडी अक्कलकोटला आली.साहेब उतरले; बाईपण उतरल्या..! 
"आलं एकदाचं तुझं अक्कलकोट "साहेब पुटपुटले व म्हणाले; "आता हे सामान कोण नेणार? रहायची सोय? गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो.मला यायचं नव्हतं...या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलं..!"
"आता बास की! " त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेला धांवत आला.." जी;सामान न्यायचंय? " साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले..! बाईच म्हणाल्या "न्यायचंय.पण गर्दी दिसतेय.कुठं रहायचं ठरलं नाहीए ..कोण तुम्ही नेणार? " 
"हां " साहेब संशयानं अजूनही पहात होते.बाईंना म्हणाले "कोण कुणास ठाऊक माहिती नाहीए. तू लागलीस बोलायला " 
"जी..मी बराबर घेऊन जातो बगा ..छान रहायची सोय बी व्हईल " 
"मग घे सामान? "बाई म्हणाल्या.
"घे सामान काय? कोण रे तू? आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल " साहेब म्हणाले..तो वयस्कर गृहस्थ हसला ;" माजं नाव नरसू ..म्या कशापाई फसवेन? फसलेत समदेच देवा; कुनी शहाना न्हाई मग म्या मारग दाखवतो..! चलातर " असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं.बाईं साहेबांना हळूच म्हणाल्या "आता गप्प बसा..किती गर्दी आहे. सोय झाल्याशी मतलब. " 
एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनी त्यांची व्यवस्थित सोय लावली..साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं.सोय लागताच त्यानं विचारलं "पायाला काय झालंय जनू? " 
"2 वर्षापूर्वी अॅक्सिडेंट झालेला. हाडाचा चुरा झाला. .ऑपरेशन झालं होतं.पण पाय अधू झाला." बाई म्हणाल्या.नरसू साहेबाच्या पाया नजिक बसला..त्याच्या डोळ्यात करुणा दाटली..! "स्वामी बाबाची कृपा म्हनून आलायसा न्हवं " तो म्हणाला.ते ऐकून साहेब ऊसळले "कसले स्वामी कसलं काय? माझा विश्वास नाहीए. हिच्यासाठी आलोय इथं..मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरची शपथ घातली म्हणून. मी नास्तिक आहे..! जा बाई आता दर्शन करुन ये मी पडतो..कटकट आहे ..!" 
"जा तुम्ही बाई मी थांबतो हतंच..साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो " नरसू म्हणला.
"नको रे आहे ते बिघडवशील " साहेब म्हणले.
" मी येते जाऊन. "बाई म्हणाल्या व गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला..जसा पाय चोळत गेला..तसं साहेबांना निद्रा लागली..थोड्यावेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं..त्यांनी पाहिलं.ऊशापाशी नरसू होता..!! सहज पायाकडं लक्ष गेलं.काहीतरी पानं बांधून पट्टी बांधलेली. साहेब क्षीण आवाजात म्हणले "नरसू;पाणी हवंय " त्यानी लगबगीनं पाणी आणलं.आधार देत स्वत: पाणी पाजलं .." बरं वाटेल बगा आता तुमाला. लै प्रवास जाला नं म्हनून.नरसू म्हणाला " 
"बरं वाटतंय ;चहा मिळाला तर बरं .होईल ..,
"हां आन्तो नं ..!" म्हणत गडबडीनं गेला.चहा आणला.पुन्हा आधार देत चहा पाजला..साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं.व म्हणाले ;."नरसू ; तुझ्यात देव आहे खरा..हाच देव..आणि लोक मुर्खासारखे मंदिर ;मठाचं स्तोम माजवतात..कुठले बाबा;स्वामी " 
"बराबर आहे ;नरसू म्हणाला "; त्यो नांदतो मंदिरात;मठात पर स्पंदतो हृदयात..!" यांवर साहेब हसले म्हणले.;"भोळा आहेस; तू इतकं केलंस..तोच देव." 
"आदी संशाव घेतलात" नरसू म्हणाला.साहेब लगेच ऊत्तरले;"
 "तसं वागावं लागतं.फसवणूक होते " नरसू हसला " बराबर हाय मानूस हरघडी फसतो.त्याला ऊमगत न्हाई.समोर असूनबी ..; तो ऊठत म्हणाला ";बरं जाऊ का? झालं काम माजं " साहेबानं त्याचे हात पकडले "का चाललास? बस."
 तो म्हणला " हाय म्या हतंच कायमचा.. पर न्हाई अजून कुनीतरी आल्येलं असल न्हवं .त्याचं बघायला हवं " अन् हे बोलून नरसू वळाला..
बाई घाईघाईनं वर आल्या "नरसू कुठंय? " साहेब म्हणले "गेला तो " बाई तिथंच कोसळल्या..रडायला लागल्या ..साहेबांना कळेना. ते उठले.पायातील कळ गेलेली..आश्चर्य वाटलं.तिला सावरत विचारलं "काय झालं?काही चोरीला गेलं? " बाईंनी पाहिलं "काय विचारता हे..हो गेलंय चोरीला..मिच गेलीय ..मी मठात गेले.तिथं नमस्कार केला अन् स्वामी मुखवट्यात नरसूची मुर्ती ..कितीतरी वेळ...!! " 
साहेब मटकन खाली बसले.सगळं आठवलं त्याचे बोल.- म्या हाय हतंच कायमचा ..समोर असूनबी वळकत न्हाई ..
आपण बोललो.."तुझ्यात देव आहे मठात ;मंदिरात नाही " तो ऊत्तरला "मठात मंदिरात नांदतो;हृदयात स्पंदतो "..साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला..देव असाच भेटत असतो पण अहंपायी दिसत नाही..म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते...ह्या विचारांत नरसूचा चेहरा आठवला.एकदम नरसू हे नावही वीजेसमान चमकून गेलं..स्वामी म्हणायचे "मी नृसिंहभान बरें " 
हे जाणवताच साहेबांचा बांध फुटला...डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. अंत:करणापासून त्यांनी हांक मारली "स्वामी sss! "
                 
       ॥श्री स्वामी समर्थ ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"