Wednesday, April 17, 2019

गिरनार-कमंडलू कुंड

🎋🌿🙏🏔 गिरनार-कमंडलू कुंड 🏔🙏🌿🎋

            गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती।त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला।सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले।हा दुष्काळ बरेच दिवस होता।शेवटी माता अनसूयेला हे बघवेना व त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या।दत्तगुरु तपस्येत लिन होते।मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले।खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले।एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला।तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला।
           ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे।आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे।दर सोमवारी सकाळी 6 वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात।कापूर, रॉकेल,काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते।हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो।त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात।लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो।मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात।
           कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते।मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते।महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत।इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत।
           आश्रमाच्या वतीने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अखंड अन्नदान चालू असते।चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात।10000 पायऱ्यावर चहा,पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे।प्रचंड वारा, कडक ऊन,धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात।अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू आहे।सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे।पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते।त्यामुळे यासाठी बराच पैसा लागतो।आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा।'दान' हा शब्दप्रयोग मुद्दाम करीत नाही कारण आपण सर्व तेवढे मोठे अजिबात नाहीत।आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येकाने थोडी चहा पावडर,साखर,दूध असे वर घेऊन जावे,तेवढीच आपलीही सेवा तिथे रुजू करावी।
           कमंडलू कुंड,धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे।वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात।
एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा हीच इच्छा।

        
🙏🏼🙏🏼🙏🏼 जय गिरनारी 🙏🏼🙏🏼🙏🏼

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"