॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -२५
रुद्राक्ष महिमा
शिवाराधनेच्या पध्दती आणि त्यांचे फळ
धर्मगुप्ताना मी प्रश्न केला ''महाराज शिवाराधना कशी करावी ? त्यातील विविध पध्दतींचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करावा'' श्री धर्मगुप्त म्हणाले, ''ॐ नम: शिवाय'' या शिवपंचाक्षरी मंत्राचे जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी ही पहिली पध्दत, महान्यासाचे विधान ही दुसरी पध्दत आणि रुद्राभिषेकाने शिवार्चन करणे ही तिसरी पध्दत. पंचाक्षर मंत्रातील पाच अक्षरे ही पंच महाभूतांची प्रतिक आहेत. जीव हा पशुप्रमाणे ममता, मोह आदींच्या बंधनात फसल्यामुळे त्याला पशू म्हटले गेले आहे. पशूबंधाचे विमोचन करणाराच पशूपतीनाथ आहे. शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात पंचकोनी नक्षत्रासारखे वर्णन आढळते. या पंचकोनी मंत्रात मोक्ष प्रदान करणारे मंत्र पहिल्या वर्गाचे, भोग, भाग्यादि देणारे दुसऱ्या वर्गात समाविष्ट होतात. पंचोपचारात भूतत्त्वाचे चंदन, जलतत्वाचे नारळाचे पाणी, अग्नितत्वाचे दीपाराधन, वायुतत्वाचे सुगंधित धूप, आणि आकाश तत्वाचे घंटानाद असे उपचार येतात.
पंचाक्षरातील पाच अक्षरे त्यांच्या त्यांच्या तत्वानुसार साधना करणाऱ्या साधकांना पांच रंगाने तत्वांचे दर्शन घडवितात.1) पांढऱ्या शुभ्र मोत्या सारखा पांढरा पादरस किंवा चांदी सारखा चकचकित प्रकाश 2) प्रवाळासारखी अरुण कांती 3) पिवळया हळदी सारखी सोनेरी कांती 4) निळया वर्णात निळया आकाशासारखी विश्वव्यापी कांती 5) शुध्द धवल कांती. भूमध्यात पांच रंगाची ज्योत प्रकाशित होणे यालाच ऋषीश्वरांनी संध्योपासन असे नाव दिले आहे. यंत्र, पंचतत्व साधना, योगसाधन आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे साधनांश आहेत. या पध्दतींनी देहात्म बुध्दीचा नाश होतो. जीवांचा देहच देवालय आणि त्यात विराजमान असलेला आत्माच शिवात्मा असे तादात्म्य साधून मोक्ष प्राप्ति होते. ही स्थिति प्राप्त होण्यासाठी पंचाक्षरी जप, महान्यास पूर्वक शिवाराधना, रुद्राभिषेक हे सहकारी आणि कल्याणप्रद ठरतात . विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र श्री विष्णुंना अत्यंत प्रिय आहे. गणेशाला मोदक अतिप्रिय आहेत. सूर्याला सूर्यनमस्कार प्रिय, चंद्राला अर्घ्य प्रिय, अग्नीला हवन प्रिय त्याच प्रमाणे शिवाला अभिषेक प्रिय आहे. अभिषेकामुळे शिव संतुष्ट होतात. ब्रह्म कल्पातील प्रलयाच्या वेळी, भविष्यातील सृष्टी साठी सकल जातीचे बीज म्हणजे समस्त जीव राशी, वृक्ष , औषधी वनस्पती यांचे बीज एका पूर्ण कुंभात भरले. त्यात अमृत सर्व
नद्यांचे जल, समुद्राचे जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या प्राणशक्तीचे त्यात आवाहन केले. या कुंभालाच पूर्ण कुंभ असे म्हणतात. या कुंभातील अमृताचेच सिंचन महर्षीनी निरंतर पृथ्वीवर केले. या कलशातील जलाचा, अमृताचा अभिषेक प्रामुख्याने कैलास पर्वतावर झाला. याकारणाने हे अमृत स्थान या नावाने प्रसिध्द झाले. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते. या दैवी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास समस्त पापापासून निवृत्ती होते.
वशिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म
जेंव्हा पूर्ण कुंभास उलटे केले तेंव्हा त्याच्यातून दोन महामुनी अवतरित झाले. या पैकी पहिले वशिष्ठ मुनी आपल्या शुभ्र तेजाने तळपत होते दुसरे अगस्त्य मुनी नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजोमय होती. ते मित्र वरूणांच्या अंशरूपाने जन्मले.
पूर्ण कुंभातील अमृतीकरण केलेल्या जलाने अकरा वेळा एकादश रुद्राभिषेक केल्यास एकादशीचे पुण्यफल ''एकादश रुद्ररूप'' हे शिवाकडून प्राप्त होते. एकादश रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील एकादशी व्रताचा असा अगदी जवळचा संबंध आहे. यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न रूपच आहेत. ''नमकाने'' रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यु दोषाचे हरण होते. सोम ग्रहाची अधिष्ठान देवता चंद्र आहे. चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तींचा वर्षाव करतो. या चंद्रकलेचे स्थान योगी पुरुषांच्या भ्रूमध्यात भुवयांच्या थोडे वर सहस्त्राराच्या समोर चमकत असते.
ईश्वराच्या विविध रूपांचे वर्णन
या कारणानेच शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असे सांगितले जाते. गुर्जरदेशात (गुजराथमध्ये) असलेल्या सोमनाथाचा मंदिरात चंद्रकांत शिला वापरूनच शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर केली आहे. येथील ज्योती सारखे चमकणारे स्फटिकाचे ज्योतिर्लिंग पुजिले जाते. शास्त्राचे असे वचन आहे की स्वत:मध्ये रुद्रतत्व आल्या शिवाय रुद्राभिषेक करू नये. महान्यासामध्ये काळ म्हणजे स्व-रूपाचा संहार करणारे, यासाठी अभिषेक करणाऱ्यानी कालात्मक होऊन यज्ञ स्वरूप शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा. बोधायन महर्षिच्या महान्यास रुद्राभिषेक विधानात शिवाचे वर्णन तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव, ईशान असे केले होते.
तत्पुरुष मूर्ति, पलयाग्नी सारखी विद्युत रंगाची असते. अघोर मूर्ती मेघवर्ण असते. सद्योजात मूर्ति चंद्राच्या कांतीसम धवल असते. वामदेवमूर्ति गौर वर्णाची असते. ईशान मूर्ति ही तेजोमय असून आकाश वर्णाची असते.
रुद्र सहस्त्रादी संख्येत असतात. रुद्राचे गण या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या देवता, एका गणात तीस हजार या प्रमाणे एकादश सहस्त्र गणात तेहतीस कोटी रुद्राचे गण असतात. हेच गण भूमी, आकाश, अंतरिक्ष, जल, वायु, शरीर, प्राण आणि मन यांना व्यापून असतात असे वेदामध्ये प्रतिपादित केले आहे.
श्रीपाद प्रभूंची अर्चना, स्मरण करणाऱ्या भक्तांना
तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह - रुद्राक्षाचे वर्णन
या तेहतीस कोटी रुद्रांचा अधिपति श्री गणपती देवता आहे. याच कारणाने आपल्यातील गणपती तत्त्वास योगमार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूनी आपला अवतार गणेशचतुर्थीच्या या मंगल दिनी या भूमीवर घेतला. यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना, स्मरण करणाऱ्या साधकांना तेहतीस कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो.
धर्मगुप्त पुढे म्हणाले ''अरे बाबा शंकरभट्टा शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण करावा. तो अत्यंत लाभप्रद असतो. रुद्राक्षाच्या चार जाती आहेत. त्या या प्रमाणे 1) ब्रह्मजात 2) क्षत्रियजात 3) वैश्यजात 4) शूद्रजात. ब्रह्मजातीचे रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचे असतात. हे रुद्राक्ष मिळणे अत्यंत कठीण असते. क्षत्रिय जातीचे रुद्राक्ष लाल मधाच्या रंगाचे असतात. चिंचुक्याचा रंग असलेले रुद्राक्ष वैश्य जातीचे असतात तर काळया रंगाचे रुद्राक्ष शूद्र जातीचे असतात. सर्वसाधारणपणे पंचमुखापासून ते सोळा मुखे असलेले रुद्राक्ष मिळतात. एकमुखी रुद्राक्ष अत्यंत विरळा असतो. दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असता तो बुडतो. हलके रुद्राक्ष, कोवळे रुद्राक्ष धारण करणे निषिध्द असते. रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली दाबून त्याच्या खाली तांब्याचे पंचपात्र पालथे ठेवावे . रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेने फिरतो. कांही रुद्राक्ष अप्रदक्षिण म्हणजे उलटया दिशेने फिरतात. या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात. असे रुद्राक्ष गृहस्थांनी वापरु नये. यांनी अनेक अनिष्ट प्रसंग उद्भवतात व संन्यास योग येतो. यामुळे असे रुद्राक्ष केवळ संन्यासी जनांनीच वापरावे. कालाग्नी रुद्राने असे सांगितले आहे की पांढरे रुद्राक्ष ब्राह्मणांनीच वापरावे. क्षत्रियांनी लाल रंगाचे, वैश्यांनी फिका पिवळया रंगाचे व शूद्रानी काळे रुद्राक्ष धारण करावे. हे रुद्राक्षच त्यांना अनुकुल असून त्यांच्या पापांचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात.
एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीस्वरूप असतो. त्रिमुखी, अग्नीस्वरूप, चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप, पंचमुखी कालाग्नी स्वरूप, षड्मुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचे स्वरूप असतो. सप्तमुखी मन्मथाचे स्वरूप, अष्टमुखी रुद्रभैरवाचे स्वरूप, नवमुखी कपिल मुनींचे स्वरूप असतो. हा रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ असतो. या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ति , ज्ञानशक्ति , क्रियाशक्ति, शांतशक्ति, वामशक्ति, ज्येष्ठाशक्ति, रौद्रशक्ति, अंगशक्ति, पश्यंती अशा नऊ प्रकारच्या शत्तिच् असतात. या कारणानेच हे रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहेत. दशमुखी रुद्राक्ष विष्णुस्वरूप, एकादशमुखी रुद्राक्ष साक्षात शिव स्वरूप, द्वादशमुखी द्वादशादित्यरूप असा रुद्राक्षांचा विविध देवतांशी संबंध आहे.
श्रीपाद प्रभूंनी, प्रकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपति श्रीगणपती, त्यांचे तत्त्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे. यामुळेच ते तेहतीस कोटी देवतेचे दिव्यस्वरूप आहेत. एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानेच होत असते. सर्व चलनाचे मूल कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणाचे तेच कारण स्वरूप आहेत. ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णुरूपात दिसतात आणि विष्णुरूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूप दिसतात. परंतु मनातील तर्क विर्तकांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात.''
श्री धर्मगुप्त पुढे म्हणाले ''अरे शंकरभट्टा ! मी सुध्दा तुझ्या बरोबर कुरुगड्डीस येऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून घेईन.'' मी (शंकरभट्ट) आणि धर्मगुप्त आम्ही दोघे कुरुगड्डीस आलो आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांनी डोळे उघडून आमच्याकडे पाहिले आणि थट्टेने म्हणाले काय उत्तम चर्चा चालली होती. श्रीपाद हे शिवरूप आहेत. मीच श्रीपाद आहे का ? तसे नसेल तर श्रीपादच ''मी'' म्हणून आलो काय ? मी कोण आहे ? धर्मगुप्ता, थोडे विवरण करून सांग ना ?'' यावर धर्मगुप्त म्हणाले ''मी पीठिकापुरमहून येत असताना श्री वेंकटपय्या श्रेष्ठी यांनी मला सांगितले होते की श्रीपाद प्रभू बरोबर कोणताही तर्क वितर्क करू नकोस. केवळ त्यांना संपूर्णपणे शरण जा. या प्रमाणे मी आपणांस अनन्य भावाने शरण आलो आहे आपल्या कोणत्याही प्रश्नास मी मौन धारण करीन. वेद सुध्दा श्रीपाद प्रभूंचे यथार्थ वर्णन करू न शकल्याने ते मौन झाले. तर धर्मगुप्ता सारख्या सामान्य साधकाची काय परिस्थिती.'' धर्मगुप्ताचे वरील कथन ऐकून श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी दोघांना चरणस्पर्श करण्याची सम्मती दिली. आम्ही अतिआनंदाने प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला. आणि काय आश्चर्य ! आम्ही दोघे ध्यानावस्थेत गेलो. या अवस्थेत किती वेळ गेला याचे भानच नव्हते. जेंव्हा ध्यानावस्था उतरली त्यावेळी सायंसंध्येची वेळ होत आली होती. श्रीपाद प्रभूंनी आम्हास कृष्णानदीचे पात्र ओलांडून पैलतिरावर जाण्यास सांगितले. त्या प्रमाणे आम्ही दोघे श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे स्मरण करीत करीत कृष्णेच्या पैलतिरावर गेलो, पैलतिरावरील नदीच्या मऊमऊ वाळूत आम्ही पहुडलो आणि केंव्हा निद्रादेवीच्या कुशीत गेलो ते कळालेच नाही. प्रात:काळी जाग आली ती अत्यंत मधुर कंठरवाने म्हणलेल्या योगी जनांच्या ''श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा'' या नाम स्मरणाने
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"