Saturday, April 20, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -24

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -२४
अर्धनारी नटेश्वर - विवरण
मी (शंकरभट्टाने) श्री धर्मगुप्तांना प्रश्न विचारला, ''महाराज, भगवान शिवाने वेगवेगळी आभूषणे आणि शस्त्रे धारण केली आहेत. ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा.'' यावर धर्मगुप्त म्हणाले, ''अरे शंकरभट्टा, गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे. तसेच श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध आहे. त्रिशूल हे भगवान शंकरांचे मुख्य आयुध आहे. त्रिशूलाला वरच्या बाजूस तीन टोके असतात ही अग्निज्वालेच्या रूपात असतात. ती तिन्ही टोके मिळून एकच शूलहस्ता प्रमाणे असतात. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची ही तीन टोके निदर्शक आहेत. या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे खरा त्रिगुणातीत शिवभगवान आहेत. हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो. श्वासाचे चलनवलन पिंगला नाडी द्वारा होऊन कपाळाच्या मध्य भागातून तो शिरस्थाना पर्यंत जाऊन पोहोचतो. इडा, पिंगळा आणि सुषुम्णा या तीन नाडया ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असे म्हणतात. हा त्रिशूलाचा अंतर अर्थ आहे. शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे. मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ति ही सर्पांच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती जागृत झाली असता अष्टसिध्दि प्राप्त होतात. या महासिध्दिंना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुध्दा एक दिव्य नांव आहे. शिवाच्या त्रिशूलाला डमरु बांधलेला असतो. हा शब्दगुणाचे प्रतिक आहे. नाद, झंकार हा आकाश गूण आहे. आकाशात शब्द प्रकंपाने विचलन करतो. आपण मंत्रजप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरुच्या आवाजा प्रमाणे आपल्या कानात घुमतो. मंत्र पुरश्चरण केल्यामुळे योग्याला आनंद प्राप्त होतो. या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो. याचे प्रतिक म्हणून परमेश्वर डमरु धारण करतो.
दोन भूवयांच्या मध्य बिंदूवर आज्ञाचक्र असते. तेच सर्व ज्ञानाचे केंद्र असते. ज्ञानी पुरुषाला अतीद्रिंय दृष्टी असल्यामुळे त्याचे ज्ञानकेंद्र विकसित असते. याच चक्राद्वारे योगी भूत-भविष्य यथार्थपणे समजू शकतात. हाच परमेश्वराचा तिसरा नेत्र असे म्हणतात. हा ज्ञाननेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते.
शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असे म्हणतात. योगाग्निमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांती प्रदायक निर्वाण स्थितिचा अनुभव येतो. ज्ञानाच्या स्थितिचा पांढरा रंग असतो, असे म्हणतात. तीच विभूती होय. आलोचना (निंदा), वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ति आल्यावर शुध्द ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे आनंद प्राप्ति होते. ज्ञानाची शुध्दी चार प्रकारे होते
1) आदिभौतिक 2) आदिदैविक 3) अध्यात्मिक आणि 4) मानसिक यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त चार विभूती रेषा कपाळावर लावतात. एक दिव्य औषधी शिलाजीत नांवाची असते. या औषधीच्या सेवनाने नित्य यौवन प्राप्त होते. पूर्व काळात शिलादुड नावाचे एक महर्षी खडयाचा आहार करून निर्वाह करीत असत. तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले. श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला. शिवांचे जन्मनक्षत्र आद्र्रा होते. उमामहेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिथुन होती. या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते. हा वृषभच नंदीश्वर आहे. नंदी हा धर्माचे प्रतिक आहे. निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते. परंतु शिवाच्या कृपेनेच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दांपत्य धर्माचे पालन करणाऱ्या दांपत्यास पुत्र रूपाने प्राप्त झाला. श्रीकृष्णाने उपमन्यु ऋषींचे शिष्यत्व पत्करुन अत्यंत निष्ठेने शिवोपासना केली होती. शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावाने जन्मास आला. हा मन्मथ वृषभ राशीतील काम स्थान आहे. धर्मबध्द असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात. त्यांची पूर्णता करणे धर्म विहित असते.
भयंकर अशा तांत्रिक सिध्दि आणि शक्ति वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात. त्यांना वश करून, आपल्या ताब्यात ठेवणारे शिवभगवानच आहेत. वाघ हा शक्ति देवीचे वाहन आहे. शक्तिस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतिक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात म्हणून त्यांना व्याघ्रचर्मांबरधारी असे म्हणतात. शुध्द ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिध्द असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतिक आहे. या प्रमाणे नित्य प्रसन्नतत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आल्हादमयी स्थितीचे प्रतिक चंद्रकोर आहे.
उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगळा नाडी असते. डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपी शक्ति इडा नाडी नावाने ओळखली जाते. अरे शंकरभट्टा ! प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास उष्णता वाढते म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात. डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शितलता मिळते म्हणून तिला चंद्रनाडी असे म्हणतात. काळ पुरुषाच्या शरीरातील राशीचक्रात मेष राशी पासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे सहा महिने सूर्यनाडी असे ग्रहित धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे सहा महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे समजले जातात. या चंद्रसूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावास्या यांची निर्मिती होते.
योगी पुरुष आपल्या वैशिष्टयपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिध्दि प्राप्त करून घेतो. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचे ज्ञान योगशक्तिमुळे प्राप्त होते. या कालचक्रालाच अर्धनारीश्वर, जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही, अशी जोडी समजावे. रात्र-दिवस, पौर्णिमा-अमावास्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृष्यमान होत असतात. रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही. माता-पिता रूपाने संबोधिले जाणारे अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात. शिवाचे कार्य संहारक आहे असे आपण म्हणतो त्याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नविन सृष्टीची निर्मिती असा आहे. सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टींचा अविर्भाव होऊन ती थोडयाकाळ पर्यंत त्या स्थितीत असते. नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो. अथर्ववेदातील समस्त अस्त्र-शस्त्र, मंत्र विद्यासिध्द होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशानरुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते. असा संवाद चालू असतानाच मी म्हणालो ''आपण शिव-पार्वती आणि आद्र्रा नक्षत्राचा घनिष्ट संबंध असल्याचे सांगितले होते. या विषयी सविस्तर माहिती सांगावी ही प्रार्थना.'' तेंव्हा धर्मगुप्त म्हणाले ''रुद्र पळत्या हरिणाची शिकार करीत असलेल्या रूपात ''मृगव्याध रुद्र'' या नावाने दर्शन देतील. हे दिव्य रूप आकाशातील आद्र्रा नक्षत्रात दिसेल.''
ग्रह संचाराचा प्रभाव
धर्मगुप्त पुढे म्हणाले ''या मृगव्याध रुद्राचे रूप नक्षत्र मंडळातील मिथुन आणि कर्क राशीच्या मध्ये आडवे दिसेल. या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू, केतू, शनी या सारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युध्द, प्रलय, देवादानवाचे युध्द, महाभारताचे युध्द या सारखी संकटे ग्रह गतीनेच येतात. कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्य बाण धारण केलेल्या उग्रमूर्ति असलेल्या रुद्राचेच मन्युदेवता रूप असे वेदांनी वर्णन केले आहे.'' धर्मगुप्त आपले वक्तव्य चालू ठेवीत म्हणाले ''माघ मासातील अमावास्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला ''महाशिवरात्री'' असे म्हणतात. प्रत्येक महिन्यातील अमावास्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला ''मास शिवरात्रि'' असे म्हणतात.''
शनीप्रदोष समयी ईश्वर आराधनेचे फळ
म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण
महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते. शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनीप्रदोष म्हणतात. या शुभ दिनी शिवार्चन करून शनीदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे. शिव शनीची आदिदेवता असल्याने तीळाच्या तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनीदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते. शनीवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुख शांती लाभते. शनी ही कर्म कारक देवता आहे. शिव ही संहारक देवता आहे. शनीप्रदोष समयी शिवाची आराधना, सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचे भस्म करून, शुध्द, नूतन, दिव्य, तेजोमय शुभ स्पंदनाने मानवाचे मन, बुध्दि, अहंकार, चित्त यांची आत्मशुध्दि करून नवीन जन्म प्राप्त करून देते.
अशा प्रकारच्या अर्चनेने शनीदेव शांत होतात. शनीवारी रात्रीच्या वेळी, त्या जीवाचे सारे दुष्कर्म, दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो. याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरवात होते. त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जाते.
पंचभूतात्मक शिवस्वरूप
शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहेत. आपल्या शरीरातील ''मूलाधार'' केंद्रात पृथ्वी तत्व असते. याचेच प्रतिक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. ''स्वाधिष्ठान चक्रात'' जलतत्व असते. याचे प्रतिक जललिंग असते ''मणिपूर'' चक्रात अग्नीतत्व असते त्याचे प्रतिक ज्वाललिंग आहे. यालाच हिरण्यस्तंभ असे सुध्दा म्हणतात. कंठस्थानात म्हणजे विशुध्दचक्रात वायुतत्व असते. त्याचे प्रतिक वायुलिंग आहे. हृदयातील आकाश स्थानात असलेल्या लिंगाला ''चिदंबर लिंग'' असे म्हणतात. या पंचभूतात्मक लिंगाची आराधना, दर्शन, अर्चना हे विषेशफलप्रद असतात. आकाशलिंग म्हणविल्या जाणाऱ्या चिदंबर लिंगाला आकारच नसतो. चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपवून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्ये काहींच नसते. शुध्द आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय. हृदयच चित्स्थान असल्याने आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते. वास्तविक पहाता आकाशाला आकारच नसतो. एकाग्र चित्ताने निजतत्वाचे ध्यान करणाऱ्या योग्याना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी , संपूर्ण ब्रह्मांडाचे, नक्षत्रांचे, ताऱ्यांचे वगैरे दर्शन होते. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तोच अरुणाचलेश्वराच्या रूपात, अरुणाचलातील पर्वत रूपात, एका महासिध्दाच्या रूपातही अरुणाचलात आहे. त्यांच्या केवळ दर्शनानेच पापांचा क्षय होतो. तोच अरुणाचलेश्वरच आज मानवाकृती मध्ये पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतार घेऊन समस्त मानव जातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगड्डीमध्ये दिव्य तेजाने विलसत आहे.
कुरुगड्डी अरुणाचल पर्वता प्रमाणे आहे. अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. ज्या प्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे तसेच कुरुगड्डी सुध्दा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपच आहे. अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ति असल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात सुध्दा शिव आणि शक्ति मिळून आहेत. अरुणाचलातील महासिध्दाच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते. परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिध्दाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रितीने होते.'' हे धर्मगुप्तांचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो ''महाराज ! मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्रीवेंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहेत असे ऐकले होते. परंतु तुम्ही ते शिव शक्तीस्वरूप आहेत असे सांगितलेत. मला हे सारे कांही स्पष्ट कळत नाही. घोटाळयात पडल्यासारखे वाटते. आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावे'' माझे बोलणे ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले, ''अरे बाबा, श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्तऋषींना सुध्दा अवगत झाले नाही. तेंव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा ? तरीपण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री वेंकटेश प्रभू कृतयुगापासून आहेत. त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी श्रीरामचंद्र या नांवाने तुझ्या घरी जन्म घेईन.''कौसल्या तनय'' श्रीराम या नांवाने सुध्दा स्वामींची पूजा काही लोक करतील. कांही काळपर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्तीस्वरूप म्हणजे बालत्रिपूर सुंदरी या स्वरूपात सुध्दा भक्तांनी आराधना केली. कांही साधकांनी त्यांची ''सुब्रह्मण्यम'' या स्वरूपात सुध्दा अर्चना केली. यानंतर श्री रामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून ''श्री महाविष्णु'' रूपात त्यांची आराधना करविली. ही सारी रूपे असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत. साधकांनी कोणत्याही रूपात श्रध्दाभावाने त्यांना साद घातली तर ते भक्ताचे रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचे रक्षण करतात. साधकांना लीला दर्शविणारे माया नाटकाचे सुत्रधार श्रीपाद प्रभूच आहेत. तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने भक्ताचे कल्याण करीत आहेत.
श्रीपाद प्रभूंच्या वामभागात शक्तिसंचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार आसतो या कारणाने ते शिवशक्तीस्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो. हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ति ऊर्ध्वचक्राकडे त्याच प्रमाणे अधोचक्राकडे म्हणजे मुलाधार चक्राकडे प्रवाहित होते. या कारणानेच ते अजून एका दिव्य चैतन्यमय शरीराने श्रीपद्मावती आणि श्री वेंकटेश्वर स्वामी रूपात आहेत. श्रीपाद प्रभू वाणी हिरण्यगर्भाचे सुध्दा स्वरूप आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेवर वास असतो. वाणीमातेचे दिव्य मानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते.
वास्तविक पहाता चिदंबर रहस्य म्हणजे, ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात. त्यांच्या एका शरिराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याहि दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो. ते वाणी, हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिव-पार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती वेंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकेच वेळी धारण करून त्या सगळयांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात. याचे वैशिष्टय असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो हीच प्रभुची योगमाया, वैष्णविमाया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य. श्रीपादांना द्वैत, विशिष्ठाद्वैत, अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल. कारण त्यांची योगमाया अगाध आहे.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"