॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -१९
श्री गुरुचरण समागम
वल्लभेश्वर शर्मा दंपती, सुब्बण्णाशास्त्री आणि मी असे चौघेजण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे स्मरण करीत होतो. त्याच वेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगण्णाशास्त्री आला तो वेदशास्त्र पारंगत होता. लिंगण्णाशास्त्री म्हणाला, ''मी पित्याच्या तर्पणानिमित्त, पादगया श्रेत्री, पवित्र असलेल्या पीठिकापुरम् क्षेत्रात आलो. माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते. ते धनवान असले तरी स्वभावाने मितव्ययी होते. ते शास्त्रात सांगितल्या प्रमाणे, संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना आपलेसे करून घेत असत. पितृदेवतांना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक दहा प्रकारचे दान यथाशक्ति देत असत. परंतु माझे आजोबा अत्यंत थोडया पैशात सर्वविधि आटोपून स्वत:चा अधिकाधिक फायदा होईल असे पहात. त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेसा नव्हता. काही कालावधीनंतर वार्ध्यक्याने त्यांचा मृत्यु झाला. माझे वडिल सुध्दा माझ्या आजोबा सारखेच होते. कालांतराने त्यांचा सुध्दा मृत्यु झाला. मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचे श्राध्दतर्पण आदि कर्मे करीत असे. आमच्या घरी अकारण होणाऱ्या ग्रह कलहामुळे माझी मन:शांती नेहमी भंग पावत असे. परमशांत स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करीत. याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली. माझा मुलगा, मुलगी, जावयी या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोसे केले होते. माझे जीवन नरकमय झाले होते. जीवनात धन असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो. परंतु माझ्या कडे तर धन नव्हतेच. शिवाय गृहकलह. या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु मरणानंतर पिशाच योनी प्राप्त होण्याची भिती वाटत होती. माझ्या मृत्युनंतर माझी शास्त्रोक्त पध्दतीने अंतक्रिया होणार नाही हे निश्चित होते. एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफ सफाईचे काम आटोपून जेवणासाठी येऊन बसलो. त्या दिवशी सुनेने विटलेले अन्न वाढून दिले. त्याला वास येत होता. त्यात थोडे किडेसुध्दा दिसले. गोशाळेतील कामाने मी अत्यंत थकून गेलो होतो. आणि भुकेने डोळयात आसवे येत होती. माझी स्थिति फारच दयनीय झाली होती. माझे आप्त, सखे, पुत्र, कांता, कन्या हे खरेच माझे आहेत का ? हा सारा मायाजाळ तर नाही ना ? माझ्या मनांत गोंधळ उडाला होता. आणि विचार शक्ति कुंठित झाली होती. इतक्यात एका अवधुताने मला दर्शन दिले. करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रांतून ओसंडत होता. त्या करुणा मूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो. ही व्यक्ति माझ्या चिरपरिचयाची असल्यासारखे मला वाटले. मी त्या अवधूतांच्या दिव्य चरणांवर डोके ठेवून नतमस्तक झालो. ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केले. अवधूतांनी थाळीतील अन्नास स्पर्श करून ते शुध्द केले परंतु ते विटके अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी ''हलवा'' नांवाचा गोड पदार्थ आला. त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतांनी खल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला. तो मी अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली. त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्यात नवीन शक्तिचा संचार झाल्यासारखे वाटले. अवधूतांनी नंतर मला एक पहार दिली व ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले. बराच मोठ खड्डा झाला त्यात दोन कुत्र्यांचे अस्थिपंजर देह दिसले. अवधूतांनी त्या खड्डयात तांदळाची पेज टाकण्यास सांगितली त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेज टाकून तो खड्डा बुजवून टाकला त्यावर ते अवधूत म्हणाले ''तुझी पिशाचबाधे पासून मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता स्थलशुध्दि झाली. आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील. पादगये प्रमाणे महिमा असलेल्या पीठीकापुरमहून तुला बोलावणे आले आहे. तू तत्काळ प्रवासाची तयारी कर बाकी व्यवस्था मी पाहीन आपण पीठीकापुरम् येथे भेटू'' अवधूतांच्या आदेशानुसार मी पीठीकापूरमला जाण्यास निघालो. घरी कोणाला सांगितले नाही. अगदी अंगावरील एका कपडयानिशी निघालो. थोडे अंतर जाताच सायंकाळ झाली. एका आमराईत मी प्रवेश केला. तेथील यजमान नरसिंहप्पा याने माझे यथोचित स्वागत केले. खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळे दिली. ती खाल्याने माझी भूक शांत झाली. त्या आमराईच्या यजमानाच्या विनंतीनुसार मी रात्री तेथेच मुक्काम केला. सकाळी स्नान संध्यादी आटोपून पुढे जाण्यास निघालो तेंव्हा नरसिंहप्पाने मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले. अवधूतांनी सांगितल्या प्रमाणे माझी खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झाली होती. त्या अवधूताच्या लीलेचे मोठे आश्चर्य वाटत होते त्यानंतर तो नरसिंहप्पा मला म्हणाला ''कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येत आहे. तो अवधूत मला म्हणाला तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल. त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणासुध्दा दे. मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातील आंबे दे. मला पडलेले स्वप्न आज खरे झाले. तुमची सेवा करण्याची संधि मला भाग्याने मिळाली व तुमचे दर्शन झाले. मी धन्य झालो.'' या घडलेल्या घटनेवरून मला असे नक्की वाटते की ते अवधूत साधी-सुधी व्यक्ती नसून तो कोणीतरी दिव्य महापुरुष असावा.
मी पुढच्या प्रवासास निघालो, नवीन वस्त्र धारण करून, वेदस्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहाने मला एका अनामिक सुखाची अनुभूती होत होती. माझ्या सोबत एक वेद पारंगत महा पंडित चालत असल्याचा मला भास झाला. तो वेदातील सावित्री मंत्रांचा उच्चार करीत होता. मी सुध्दा त्यांच्या बरोबर वेद म्हणत होतो. एवढयात तो म्हणाला, ''सावित्रीवर्णन मुख्य मंत्र आहे. त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषिनी सावित्री काटक चयन केले. ते सुध्दा पीठीकापुरम् येथेच घडले. कधितरी केलेले विधान आज सत्य होऊन पीठीकापुरम येथे श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. वेद हे अपौरुषीय आणि ईश्वरनिर्मित आहेत. वेद पठनाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे. परंतु वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येते. ब्राह्मण कृष्णाची भक्ति करीत परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुऊन ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पीठिकापुरमहून बोलावणे आहे. तू किती भाग्यवान आहेस !'' तेंव्हा मी म्हणालो, ''अहो महाराज श्रीपाद वल्लभ कोण आहेत त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय ?'' ''अरे बाबा श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे क्षालन करणारे असते. ते साक्षात दत्तात्रय प्रभु आहेत. त्यांची जन्मभूमी पीठीकापुरम क्षेत्र आहे. पूर्वयुगांत ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्या वेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे हनन केले. त्या काळी विष्णुदत्त आणि सुशिला हे एक पुण्यवान दंपती राहात होते. सुशिला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनसूये समान होती. विष्णुदत्त एक अत्यंत विद्वान आचार संपन्न सच्छील ब्राह्मण होता. त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रिऋषि प्रमाणे स्थान प्राप्त केले होते. या उभय दांपत्यांनी सती अनसुया आणि अत्रिमुनी बरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती. ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते. त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही. या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो. विष्णुदत्त आणि सुशिला पुढील जन्मात सुमतीराणी आणि अप्पलराज शर्मा या रूपात जन्मास आले. त्यांनी केलेल्या तपाचे फल स्वरूपच त्यांना श्रीपाद वल्लभ रूपाने एका दिव्य पुत्राचा लाभ झाला. अप्पळराज हे भारद्वाज गोत्राचे, अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्व युगात लाभाद्र नावाचे एक वैश्य मुनी होते. ते श्री मातेच्या वासवी कन्यका अवतारात तिचे पिता भास्कराचार्युलु होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते. तू पीठिकापुरमला त्या महान पुरुषांचे दर्शन घेऊ शकशील. तुझे उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा, वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्व जन्मात, पीठीकापुरम् मधील वेंकटपय्या श्रेष्ठी आणि त्यांचे वडिल सुब्बरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता. परम पवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठीच्या घरी सेवा करण्याने आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचे फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता. पिठीकापुरम् मधील वेंकटअप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता.''
कर्म बंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे. यज्ञ करतांना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असे शास्त्र वचन आहे. परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास कांही होत नाही याचे कारण काय ? असा प्रश्न श्रीपाद प्रभूंना शिष्यांनी विचारला. तसेच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञफलस्वरूप शुभ घटना घडतात परंतु अशुभ घटना मात्र घडत नाहीत. याचे कारण काय ? श्रीपाद प्रभु म्हणाले ''पुत्रा, सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात. यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात. त्यांच्या जवळ योगाग्नि भरपूर प्रमाणात असावा लागतो. त्या अग्निने पवमान घटातील विद्युत जळू शकते. महायोगी असणाऱ्या पुरोहिताने शास्त्र विधिपुर्वक यज्ञ केल्यास त्याचे चांगले फळ मिळून विश्वाचे कल्याण होते. परंतु असे न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही. यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रूपये 16, 116, 1116 अशा संख्येतच दिली जाते यात सुध्दा रहस्य दडलेले आहे. गोत्र हे पितृसंबंधित असते हे सृष्टीच्या अंतांपर्यंत बदलत नाही धर्म हा सात पुरुषांमध्येच फिरत असतो. सपिंड हे मातेशी संबंधित असते. विवाहयोग्य मुलगा आणि धन ही दोन उत्तम कर्माची फळे आहेत. स्त्री ही अग्निरूप असते ती प्रकृतीत आवश्यकच असते.''
श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ते आदि शंकराचार्याप्रमाणे पक्षपात रहित होते. गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुलभेद मुळीच नव्हता. आदि शंकराचार्यानी आपली हेम विद्या सत्वगुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या गौड कुलातील लोकांना दिली. शंकराचार्यांना वाटले हेमविद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनांच्या मोहाने त्यांच्या इष्ट धर्माचे पालन करणार नाहीत. शंकराचार्यां प्रमाणेच श्रीपाद प्रभूंनी जाती, वर्ण, मत, वय यांचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला. पृथ्वी , आप तेज वायु आणि आकाश ही पंच महाभूते आणि मन, बुध्दि, अहंकार ही अष्टधा प्रकृती जडस्वरूप आहे. एक (1) हे चित्र प्रकृतीचे प्रतिक आहे. 2 पासून 10 पर्यंत असलेल्या आठ संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत. शून्य (0) हे ब्रह्मतत्त्वाचे दिग्दर्शक आहे. नउ (9) या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचे रहस्य दडलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत ''दो चौपाती देव लक्षी'' आणि दोन पोळयांसाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8, या संख्येचे प्रतिक आहे. स्वामींच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत. सृष्टीतील सर्व द्वंद्वाचे दोन (2) हे प्रतिक आहे. देहाचे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशी चार (4) प्रतिके आहेत. ब्रह्मतत्त्व हे कधीच बदलत नाही. ते नउ (9) या संख्येचे द्यौतक आहे. महामाया ही आठ (8) ह्या संख्येने दर्शवली जाते. श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहेत.
श्रीपाद श्रीवल्लभांचे विराटरूप
मी ब्रहत्शीला नगरातील पेनुगाठेडा गावाचा रहवासी आहे. माझे नांव गणपती शास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर (काकीनाडा) गावात आलो. गुरुंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे. माझ्या गुरुदेवांच्या घराजवळच त्यांची शेती होती. गायी वासरे होती. मी गायी वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्याचे वाटप करण्याचे कामसुध्दा आनंदात करीत असे. एके दिवशी मी गायींना घेऊन गेलो असताना मला दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो आमच्या शेतात आला. त्याच्या गळयातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला. मी त्याला विचारले ''तुझ्या गळयात जानवे दिसते, तू कोण आहेस ? त्या वर तो बालक म्हणाला मी मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजलास हे कांही चूक नाही. परंतु तेच कांही सर्व सत्य नाही. माझ्यातील क्षत्रियांची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही. परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही परंतु ते पूर्णसत्य नाही. माझ्यातील शुद्राची लक्षणे पाहून कोणी मला शुद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्णसत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही. परंतु ते ही संपूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या पलिकडे आहे, अतित आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतित आहे परंतु त्यांचा आधारभूत सुध्दा आहे. मी परमसत्य आहे. ते अवधूताना ज्ञात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे तो सर्वधर्माच्या अतित आहे, आणि त्याचा आधार सुध्दा आहे. हेच माझे परमप्रिय तत्त्व आहे. सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्त्वापेक्षा हे सुमधुर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो. स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते. अर्धनारी नटेश्वर या दोन रूपांनी एकत्र असलेला मी मन, वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील ?'' त्या गुराख्याने असे सांगताच माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला, ''आताच मी शनि देवाशी बोललो. मी या गणपती शास्त्रीस चित्र-विचित्र बंधनानी बांधून त्यास त्रास दिला त्या वेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला. त्यावर मी म्हणालो मी याचे कर्मफळ गाईच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले. तू अशा बंधनात पडु नकोस.'' ते ऐकून माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिति दाखविली होती. मी कांही बोलण्याच्या स्थितित नसताना तो गुराखी एका गायीजवळ जाऊन म्हणाला,''हे गायत्री मला खूप भूक लागली आहे. दूध देशील का ?'' त्या गोमातेने होकारार्थी मान हालविली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्या गुराख्याने पोटभर दूध पिले. आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वांझ होती तरी तिने त्या गुराख्यास दूध दिले. तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले. त्या गुराख्या बरोबर एक दहा वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती. दिसायला दोघे सुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटे. त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते. तेवढयात वेंकटअप्पय्या श्रेष्ठी त्यांच्या घोडागाडीतून उतरले. त्यांच्या बरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता. तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचे मला नंतर समजले. माझ्या गुरुदेवांना ही भूमी वेंकटअप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांनी दान दिली होती. या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते. या शेताची पहाणी करण्यास श्रेष्ठी पीठीकापुरम् हून वायसपूर या ग्रामात येत असत. श्रेष्ठींना त्या गुराख्या बरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या गुराख्याने आणि त्याच्या बरोबर असलेल्या कन्येने श्रीपादांना नमस्कार केला. त्या वेळी श्रीपाद म्हणाले ''आजोबा ! तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले.'' आजोबा म्हणाले ''त्या दोघांकडे बघ किती नयनमनोहारी दृष्य आहे. बघणारा आणि जे बघायचे ते दृष्य दोन्ही एकच आहे. यातील वेदांत विषय मला कळत नाही.'' तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''यात वेदांत काय आहे ? श्रीहरी सुध्दा अपरिमित, निर्गुण निराकार असुन सुध्दा आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नव रसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृष्यांची कल्पना करणे हा सुध्दा सृष्टीचाच एक नियम आहे. ज्या ठिकाणी द्वैत दिसते तेथे वास्तविकत: अद्वैत असते. तर द्वैत खरे का अद्वैत खरे ? ते विचार करून सांगावयास हवे.'' त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या. मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभुंचीच माया तर नसेल ना ? अशी शंका आली. श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले ''आजोबा तुम्हाला शंका कशाची येते आहे ? जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तो पर्यंत माझा, सर्व शक्ती सहित अदृष्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील. अनघा देवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहे परंतु ते आपणास दिसत नाही. तेच तुम्हास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात समक्ष दिसतात. मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे. मी माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन. श्रेष्ठी राजऋषी असल्याने त्याने मला निष्कलंक भक्तीपाशात बांधून ठेवले आहे. म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सांनिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही. सृष्टीचे नियम चित्र-विचित्र आहेत. कर्म आणि कर्मांची फळे यांची संभावना देश कालपरत्वे ठरत असते. सर्व भक्त गणांना माझ्या आचरणाने, माझ्या लीलेने, माझ्या महिम्याने ज्ञानबोध करणे, हा सुध्दा माझ्या अवतार कार्यांचाच एक भाग आहे.'' श्रीपाद प्रभू आमच्या बरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पहात असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभुंच्या रूपात विलीन झाले. वसंतऋतु नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागली. त्या झाडाला एकच एक फळ लागले होते. ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले. ते कच्चे फळ स्वामींच्या हस्त स्पर्शाने तत्काळ पिकून मधुर रसभरीत झाले. ज्या प्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरविते, जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशुने खावा म्हणून त्यास गाणे म्हणून, गोष्टी सांगुन भरविते तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला. स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्त्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य, प्रेम, यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघा माते सारखे वाटत होते. श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता. श्रीपादाच्या ओंजळीतून थोडा वर उडाला त्या वेळी त्यांची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती. या वेळी श्रीपाद प्रभु म्हणाले ''बी अगोदर असते का झाड अगोदर येते असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात. या दोघांच्या ही अगोदर एक शक्ति असते ती म्हणजे ''ईश्वर'' त्याच्या संकल्पानुसार 'बी' पासून झाड किंवा झाडा पासून 'बी' निर्माण होत असते. त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही. मालिन्याने उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्य रहित जीव त्या ईश्वरी शक्तिस थांबवून ठेवतो . परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपिक जमिनीत पेरलेल्या 'बी' प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुर्नजन्म घेतात व दैवी कार्य संपन्न करतात. हे कार्य झाल्यावर ते पुनरपि परमात्म स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समिप राहून अत्युच्य आनंदाचा लाभ घेतात. जीवात्मा आणि परमात्मा यात भेद भाव करणारे जीव सुध्दा कारण देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही. द्वैत, विशिष्ठअद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एकादी मनोकामना पूर्ण होते. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ, का विशिष्ठ अद्वैत श्रेष्ठ, का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो. ''सृष्टी , स्थिती आणि लय'' या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात. ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे तिघे आपआपल्या कल्पांतांत अव्यक्त स्वरूपात असतात. ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त , साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात. जीवांना आपआपल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो. या कार्यात त्यांना दैवी शक्तींची मदत होत असते. या दैवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ति सुध्दा असतात. यवन लोक सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला ''अल्ला'' असे संबोधतात तर इसाई लोक त्यालाच ''येशु'' असे म्हणतात. संबोधन कोणत्याही नावाने केले तरी सर्वामध्ये एकच आदरणीय, प्रेमळ, करूणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते.'' सर्व धर्मांत, सर्व मतांत, सर्व सिध्दांतात, स्वयं प्रकाशाने चमकणारे मूळ तत्व 'मी' च आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालविणारा 'मी' च आहे. मी सर्व तंत्रामध्ये स्वतंत्र असल्याने, मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देव देवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा 'मी' च आहे. त्यामुळे त्या, त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांचा स्विकार करणारा 'मी' च आहे. सर्वांना बोध करणारा 'मी' च आहे. कलीपुरुष अंतर्धान पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे, असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने किंवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणाने संवाद साधणारा 'मी' च आहे. वेदांतात, सुध्दा प्रथम 'सत्य', नंतर 'ज्ञान' आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे. 'मी' च तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्म स्वरूप आहे. ''नास्तिकांना'' देव नाही असे सांगणारा 'मी' च आहे. आस्तिकांना देव आहे याची साक्ष 'मी' च देतो. समस्त ''गुरुस्वरूप'' माझेच आहे. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा 'मी'च आहे. जो साधक माझी निर्मल भाव-भक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवितो. मी श्रीपाद आहे मी श्रीवल्लभ आहे. आजोबा, तेंव्हाचा अति प्राचिन असा योगी अत्रि-अनसूयानंदन आज श्रीपाद श्रीवल्लभ आहे. भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पीठीकापुरम या क्षेत्री अवतार घेतला आहे. श्री वेंकटअप्पय्या श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर ओसंडून वाहू लागला. त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ अलिंगन दिले. त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचे वर्णन शब्दांकित करणे केवळ अशक्य होते. थोडा वेळ थांबल्यानंतर ते सहज स्थितित आले आणि श्रीपादांना म्हणाले ''अरे बाळा श्रीपादा, आमच्या वंशावर तुझी अशीच सदैव कृपा असू दे. आमच्या सर्व गोत्रजा तुझा अनुग्रह असू दे. आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे.'' त्यावर श्रीपाद प्रभु म्हणाले ''तथास्तु'' ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे. क्षत्रियांना दोन वर मागण्याचा, वैश्यांना तीन वर मागण्याचा तर शुद्रांना चार वर मागण्याचा अधिकार आहे. तेहतीस कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान करीत आहे. बापनाचार्युलुच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी ''श्रीपाद श्रीवल्लभ महा संस्थान'' उभारले जाईल. हे महासंस्थान तुमच्या घरापासून तेहतीस पावलाच्या अंतरावर असेल तसेच ते श्री बापनाचार्युलूच्या व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुध्दा तेहतीस पावलांच्या अंतरावरच असेल. तुमच्या वंशातील तेहतीसाव्या पिढीतल्या व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे. तुमच्या वंशातील ''माडेय'' नांवाच्या महापुरुषास या संबधी मी आदेश देणार आहे, तो असा, त्याने गुरुवारी मध्यान्ह काळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्विकारावा. यामुळे माडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय हस्त राहील. त्यांची सदैव उन्नती होत राहील. तू इच्छिल्याप्रमाणे आर्यवंशावर सर्वदा माझी कृपादृष्टी राहील. आर्यवंशीयाना राज्याधिकार मिळतील. भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधि लिखितानुसार तो पीठिकापुरमला येईल. त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल. नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पीठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील. हे माझे वक्तव्य काळया दगडावरील रेघेप्रमाणे आहे. सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही. आजोबा, कालांतराने माझ्या या जन्मीभूमीवर बरीच परिवर्तने घडतील. या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून ''मृण्मयी'' पात्र मिळेल. पीठीकापुरम् या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचे भाग्य केवळ पूर्वसुकृतानेच लाभते. आर्यवंश कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य करण्याचे महाभाग्य लाभणार आहे. त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे. अविश्वासु अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्व देतील. माझे चरित्र पारायण करणाऱ्यांना ''अभिष्ट सिध्दि'' प्राप्त होतील. पीठीकापुरम् या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याहि सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन. पीठीकापुरम् क्षेत्री माझ्या ''चित्रा'' या जन्मनक्षत्रावर जो श्रध्देने माझी अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करीन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील. असा माझा आशिर्वाद आहे. भूत प्रेत पिशाचादी अदृष्य शक्ती पासून झालेल्या व्यथा मी दूर करीन. श्रावण शुध्द पौर्णिमेस, माझी बहिण वासवी कन्यका हिने मला राखी बांधली. तो पुण्य दिवस आहे. या दिवशी पीठीकापुरम क्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. या सर्वांना मी स्वत: प्रमाण आहे. माझ्या लीला स्वयं प्रमाण आहेत. सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी ?''
श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्याने सारेजण अत्यंत भारावून गेले. त्यांच्या लीलांचे वर्णन करणे महाकठीण आहे. दुसऱ्या दिवशी मी, वल्लभेश्वर शर्मा दंपती. सुब्बण्णा शास्त्री, लिंगण्णा शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला निघालो. श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशिर्वाद दिला. आणि सुहास्य वदनाने ते म्हणाले ''अहा हा ! काय ही चर्चा रंगली ! श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचे वर्णन करण्यात खूप वेळ गेला. मल्लादी यांचे ऋण, वेंकटप्पय्या यांचे ऋण श्रेष्ठी यांचे ऋण तसेच वत्सवाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही.'' असे सांगून स्वामींनी मौनमुद्रा धारण केली.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"