Wednesday, April 17, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -18

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -१८
संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन
मी त्या ब्राह्मणद्वया समवेत यथाकाली कुरुगड्डीस येऊन पोहोचलो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक असलेले आदि, मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे लीलावतारी भगवान-श्रीपाद प्रभु कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते. त्यांच्या दिव्यमंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम, करुणा, वात्सल्य ओसंडून वाहात होते. ते माझ्या जवळ आले. मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही. ते स्वत:च मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्याना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलुतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले. मी दिड़मूढ झालो. ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले ''बेटा शंकरभट, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.'' त्या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो. समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला . माझी कुंडलिनी शक्ति जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृष्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला अलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसा नसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले, नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोडया वेळासाठी थांबले होते. माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले. माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्वचैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले. या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो. त्यांचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे. या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोटयान् कोटी ब्रह्मांड, सृष्टी , स्थिति, लय पावत आहेत असे मला भासमान झाले. मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता. 'मी' चा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो. हे सर्व मला चित्र विचित्र वाटत होते. तेवढयात श्रीपादप्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले. आणि मी सहज स्थितीत आलो. संपूर्ण विश्वाचे आदिगुरु असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळयात आणून पहात मंद मंद स्मित करीत होते.''
यवनांना श्रीवल्लभांचे दर्शन
माझ्या बरोबर आलेल्या ब्राह्मण द्वयांना श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य नव्हते. श्रीपाद स्वामी मला म्हणाले ''तुझ्या बरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत ?'' मी म्हणालो ''प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत.'' त्यावर प्रभु म्हणाले ''हे ब्राह्मण दिसत नाहीत, गोमांस खाणारे यवन दिसतात. खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार. एवढयात ते ब्राह्मण म्हणाले ''आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही. आम्ही कुराण वाचतो'' त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभीतच झालो. ''श्रीपाद वल्लभ नावाने माया वेषाने संचार करणाऱ्या जगत्प्रभु श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्माचे पुण्यफल आहे. त्या स्थिर भावात भक्तीभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महद्भाग्य आहे. गोमातेत सर्व देवता वास करतात. गायीविना घर स्मशाना सारखे असते. श्रध्देने गोसेवा करणारे मला खूप आवडतात. गायीचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो. यज्ञ याग करताना शेळीचे बलिदान दिले जाते. यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशुसुध्दा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात. यज्ञ पशुला चांगला जन्म मिळावा म्हणजे यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योग बलाने समृद्ध असावा लागतो. जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते. देश कालानुसार धर्म-कर्मपध्दतींमध्ये थोडा थोडा बदल होत असतो. यवन असणाऱ्या तपस्वींनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वरार्पण बुध्दीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते. परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे. कौरव पांडवाच्या युध्दासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन व श्रीकृष्ण निघाले. त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला. पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती. तो अशा दगडाच्या शोघातच होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलासाठी जेवण घेऊन आला. जेवण झाल्यावर, पाणी अडविण्यासाठी जेंव्हा दगड मिळाला नाही तेंव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडविण्यासाठी ठेवले . त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करतांना कोणताही भाव नव्हता. ते दोघे निर्विकार होते. शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते. तोच त्याचा धर्म होता. शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रध्दाभावाने करीत होता. या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली. अरे नाममात्र ब्राह्मणा, गोमांस भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही. पूर्वपुण्याईने आणि पूर्वपितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारूण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला. हेच तुमचे महद्भाग्य समजा. तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारीत नाही. तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या कमंडलूतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही. तुम्ही येथून तत्काळ निघून जा. तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे. तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा. तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील. माझ्या दर्शनाने पुनित झाल्यामुळे कांही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अबदुल या नावाने ओळखले जाल. महाराष्ट्रातील शिरडी गावात श्रीसाईबाबा नांवाचे एक महात्म्ये अवतरीत होतील ते तुमचा उध्दार करतील. हे माझे बोल काळया दगडावरील रेषे प्रमाणे आहेत.'' असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले.
मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो. तेंव्हा तेथे रविदास नांवाचा एक रजक आला. रविदास श्रीपाद प्रभुना सारखा प्रणाम करीत होता. परंतु प्रभु त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. थोडया वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले. याचे मला आश्चर्य वाटले. श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. तेंव्हा माझ्या नेत्रचक्षूंसमोर चित्रविचित्र दृष्य दिसले.
श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह
रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. ते पंडित रविदासाला म्हणाले ''मी महा पंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीकडे जात आहे त्यानी मला बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील'' ते ऐकून रविदासाने होकार दिला. नाव मार्ग आक्रमु लागली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासीक कथेंची काहींच माहिती नाही. तो पंडित म्हणाला ''अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहींच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थाश जीवन व्यर्थ घालविले. रविदास ते ऐकून निराश झाला. नाव चालताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला. त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले व त्यातून पाणी आत शिरू लागले. रविदास त्या पंडिताला म्हणाला ''महाराज आपणास पाण्यात पोहता येते का ?'' पंडित म्हणाला, ''अरे मला तर पोहता येत नाही.'' रविदास म्हणाला ''महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूचे नांव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्यकांती दिसली. त्याने आदि अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला-कथा ऐकल्या होत्या. रविदासाने त्या दिव्यकांतीस अत्यंत श्रध्दा भावाने नमस्कार केला. नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते. इतक्यात एक महदाश्चर्य घडले एक अदृष्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नांव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. रविदास या पूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता. परंतु आज जेंव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेंव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले. त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्रचर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना. श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले ''अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे. तू महा पंडित असून सदगुणांचा संचय करण्या ऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशिल पत्नीचा छळ करून, एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पती पासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे. तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने क्षोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्या कडे कसा आकर्षित झालास ? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे. आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर. तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही. तुझ्या विद्वतेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस ? तत्काळ उत्तर दे.'' सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना. जणु काही मुकाच झाला होता. त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती. श्रीपादवल्लभ स्वामी म्हणाले, ''तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षाचे वाढविलेले आयुष्य देत आहे. तु रजकाच्या स्त्रीस जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस. परंतु पुढील जन्मात ते रजक दांपत्य महाराजाचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील. तेंव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या तीन वर्षात कांही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही. आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील. मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फल स्वरूप तो माझी सेवा करील. तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा.'' स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तेथून निघून गेला. रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला. तो दररोज स्वामींचे कपडे धुऊन आणि आश्रमातील अंगण, झाडून स्वच्छ करीत असे. पुजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते. श्रीपाद प्रभु स्नानासाठी कृष्णानदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे. आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की ''श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणारा आहे.''
एकदा रविदास कृष्णानदीच्या तिरावर उभा होता. त्या वेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जल विहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्तांने पहात होता. तेवढयात श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटोपून बाहेर आले. रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, ''काय पहात आहेस रे रजका ?'' त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वत:ला सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी म्हणाले, ''त्या राजाच्या वैभवाकडे पहात होतास ना ?'' रविदासाने होकारार्थी मान हलविली. ते पुढे म्हणाले, ''तुला राजा होण्याची इच्छा आहे ना ? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा (सध्याचे बीदर) राजा होशील. त्या वेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन.'' तो रजक म्हणाला, ''प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी.'' स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवन कुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला. राज्य वैभव उपभोगून जीवनाच्या उतार वयात त्यास श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्व जन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणांवर नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला.
खिरीने भरलेले अक्षय पात्र
आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरूण ब्राह्मण तेथे आला. तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते. त्याचे नांव ''वल्लभेश्वर शर्मा'' असे होते. त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता. श्रीपाद प्रभू पीठीकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मियांची सविस्तर माहिती, त्यांचे क्षेमकुशल विचारीत असत. हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता. वल्लभेश्वर पीठीकपूराहून आला होता. त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे, स्नेह संबंधितांचे क्षेम कुशल विचारले. मध्याह्नाची वेळ झाली होती, स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते. इतक्यात कांही तरी घेण्यासाठी स्वामीनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले. त्यात खीर भरलेली होती. तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली. परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले. श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविदास सर्व भिक्षान्न घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला. नदीतील जीवजंतूंना सुध्दा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता. श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते. परंतु त्याच्या जवळ रविदास बसला होता. माझ्या बाजूस ''सुब्बण्णा शास्त्री'' नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता. एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूना विचारत होता. प्रभू म्हणाले ''मी असताना तुम्हाला काळजी कशाची ? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते.'' प्रभु पुढे म्हणाले ''हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुब्बण्णा शास्त्री त्याला पौरहित्य शिकवित आहेत.'' वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले तुझ्या माता पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे. श्रध्दाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते. गरुडपुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्र वचन आहे. तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. ''पीठीकापुरम् मध्ये मल्लादी लोक, वेंकटप्पा, श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस, महापिशाच्चाच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्काळ निवृत्त होते. दारिद्रय आणि दु:खाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्विकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते.'' हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळयात अश्रु दाटून आले. सद्गदित झालेल्या कंठाने श्री श्रीपाद स्वामी म्हणाले ''या तीन वंशांशी माझा ऋणानुबंध कालातित आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो. मला कोठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे यथेच्छ जेवण म्हणाले, वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धडास जोडून ठेव .'' त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृत देहाकडे अमृत दृष्टीने पाहिले. दुसऱ्या क्षणीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्या प्रमाणे उठून बसला त्या चवथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला. त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले. वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चवथा चोर अत्यंत आनंदित होता. वल्लभेश्वर कुरवपुरला येऊन पोहोचला. त्याने एक सहस्त्र ब्राह्मणा ऐवजी चार सहस्त्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती.
श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप
आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो. मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते. तितक्यात डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली. ते म्हणाले ''कोणतेही कार्य अकारण होत नाही. प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच. सृष्टीचे विधान चित्र-विचित्र आहे. निर्गुण, निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपांत अवतरित झालो आहे. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुध्दा येतो. हा फार गुंतागुतीचा विषय आहे. सर्व शक्ति माझ्या स्वाधीन आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणू रेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे. अणु रेणुंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे. या अणू अणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रळयकाळ साधणारा असा रुद्ररूप ही मीच आहे. हे ज्ञान आणि हे अज्ञान ह्याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वाना बंदिस्त मीच करतो. जेंव्हा जेंव्हा भक्त आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलावतात तेंव्हा तेंव्हा मी सहस्त्र बाहूंनी त्यांचे रक्षण करतो. हे माझे अनादी तत्वही मीच आहे. प्रत्येक जीव मात्रात व्यापून असलेला 'मी' तोच 'मी' अशा 'मी' मध्ये असलेले शक्तिमत्व , सर्वज्ञता, सर्वांतर्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता. याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिलेत तर आश्चर्य वाटण्या सारखे कांही आहे का ?'' परब्रह्मस्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असतांना घंटानाद ऐकू आला. सगळे आश्चर्य मन:स्थितित असतांना तो घंटानाद शांत झाला.
श्रीपादांची मातृभावना
आम्ही सर्वजण बसलो असतांना श्रीपाद प्रभू म्हणाले ''श्रीपाद श्रीवल्लभाचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे. माझे नामस्मरण केल्या शिवाय कोणताच अवधूत, पूर्ण सिध्दी प्राप्त करू शकत नाही. तसेच महान योगी सुध्दा सिध्दी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात. हे वल्लभेशा तुझे आईवडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकानी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपती हिरावून घेऊन तुला भिकारी केले. हे आम्हाला ज्ञात आहे. त्या नातेवाईकांची मुले सुध्दा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो. तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले. तु धन घेऊन कुरुगड्डीस येत असतांना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले. तू आमचे स्मरण करताच आम्ही तेथे प्रगट होऊन आमच्या त्रिशुलाने तीन चोरांचा वध केला. चौथा चोर आम्हास शरण आला त्याचा दोष ही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले.'' श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळयात पाणी आले. ते पाहून श्रीपाद प्रभु म्हणाले, ''हे माते ! प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते. त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीसाठी आम्ही बालकच असतो. तू दु:खी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव . तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल. तू अखंड सौभाग्यवती राहाशील. आमचे हे वचन काळया दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे. त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ति बदलू शकत नाही. मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नांव चिरकाल टिकून राहील. आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नांवाबरोबर सरस्वती नांव जोडून नृसिंहसरस्वती असे नांव आम्हास लाभणार आहे. आमचे आजोबा बापनाचार्युलु यांचे नांव सुध्दा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे. नृसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबा सारखेच असेल. आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते. त्यांच्या कडे वेद शास्त्राचा अभ्यास केला. तुम्ही पहात असलेली ही घंटा एके काळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे. ती भूमीतील भुयारी मार्गाने सुध्दा जात असे. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या तेलुगु भाषेतील श्रीपाद वल्लभ चरित्रामृतातील आठरावा अध्याय येथे संपत आला आहे. ती घंटा पीठीकापुरम गावी येऊन पोहोचली आहे. ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वत:च्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पीठापुरमला पाठवली आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"