अनायासेन मरणं
-सोनाली तेलंग
अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं
देहि मे क्रिपया शम्भो त्वयि भक्तिं अचन्चलं
माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधी कधी त्यांचा गळा सुद्धा भरून यतो हे म्हणतांना. त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुदा एकच असते. मला पण छान वाटतं, असं वाटतं की माझ्या स्वयंपाकवर अनायासे संस्कार होताहेत. पूर्ण पूजा झाल्यावर जेंव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात तेंव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते. त्यांची पाठोमोरी आकृती, देवाजवळ जळणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंव्हा तत्सम फुलांने सजलेले माझे छोटेसे देवघर.
शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर अनायसेन मरणं : मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायसेन - सहज. विनादैन्येन जीवनं : जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे, देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर: - मृत्यू नंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर 'हे परमेश्वरा तुझे'. पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले
गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हवा
न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा
काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कार वर्गाची गरज भासेल का? परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते, दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता. हल्ली संस्कार कमी पडतात, बोलता बोलता ती म्हणाली, आता काय ग आपली मुलं मोठी झाली, संस्कार वगरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली, आता परिवर्तन होणार नाही. मला तेंव्हा सांगावंस वाटलं तिला, संस्कार काय १०वी-१२वी किंव्हा graduation असं नाही ग, आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही. ती तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे, पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील. आज कदाचित त्याच महत्व तिला कळणार नाही, पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल त्यावेळी ही 'संस्कार शिदोरी' तिला उपयोगी पडेल.
मागणं आपल्या संस्कृतीतच नाही. जमेल तितकं देत राहणं. म्हणूनच जरी कर्ण चुकीच्या बाजूने लढला तरी त्याची महती कमी होतं नाही. तो दानशूर होताच आणि तीच त्याची ओळख ठरली.
मांगन मरन समान है, मत मांगो कोई भीख,
मांगन से मारना भला, यह सत्गुरु की सीख!!
देवासमोर हात जोडतांना 'नवस' बोलण्यापेक्षा 'दिलेल्या जीवनाबद्दल आभार' मानणे ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती. आपल्या जीवनाची जो पर्यंत 'जवाबदारी' आपण घेत नाही तोपर्यंत 'ती अगाध' शक्ती सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण त्याची जवाबदारी घेतो त्या क्षणी आपले 'मागणेच बदलते'.
अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्। देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।
@ *सोनाली तेलंग*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"