🌼🌼॥ श्री॥🌼🌼
सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत. पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते. अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो. गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच. वैद्याने जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी. गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि.मी.अंतरावर आहे. समर्थां साठी रोज दोन हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याणस्वामींनी स्विकारली. गुरु सेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला. दोन भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले व येताना भरलेल्या हंड्याची कावड करुन रोज पाणी आणू लागले. एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्याचे निरीक्षण करीत सता कल्याणस्वामींना पाणी आणतांना त्यांनी पाहीले. कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता. कल्याणाची काहींतरी न्याहरीची व्यवस्था केली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करुन समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी दोन शेर हरभऱ्याची डाळ, अर्धा शेर गुळ व पावशेर साजूक तूप देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कल्याणाला बोलावून घेतले व प्रकृती उत्तम रहाण्यासाठी दिलेला शिधा न्याहारीसाठी वापरण्यास सांगितले. दुसऱ्या दिवसापासून कल्याणस्वामींना रोज शिधा सुरु झाला. त्या मुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखू लागले. माणसाने स्वतः जास्त खाल्ले तर त्याचे पोट दुखतेच,पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेले पाहून त्याचे पोट दुखू शकते. कल्याणांना जास्तीचा शिधा मंजूर झाला म्हणून सारे जण त्यांना डाळगप्पू असे म्हणू लागले. खरंतर त्यांच्या तोंडावर बोलायची कोणाचीच ताकद नव्हती.
"आता हा डाळगप्पूच पहा !" केवळ ढोर मेहनत आहे. भरमसाठ खायच आणि गुरासारख राबायचं, कधी जप करणे नाही, दासबोध वाचन नाही, अशा दिनचर्येने त्याच कधीही सार्थक होणार नाही. "ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली. एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले *"तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?"*सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले. यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंतचा सर्वांचा समावेश त्यात होता.
*"ऐसा सद्गुरु पूर्णपणी"*पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल ?" सारे शिष्य गडबडले. अगदी अकराशे पारायणे झालेल्यासुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला. तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले *"स्वामीजी, ऐसा सद्गुरु पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."* कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून पाहीला संपूर्ण बरोबर होती. समर्थांनी विचारले "कल्याणा,तुझी किती हजार पारायणे झाली." हात जोडून कल्याण म्हणाले *"स्वामीजी, आपल्या कृपेने एकच पारायण मनापासून घडले."* स्वामी म्हणाले *"बरं ते जाऊ दे अलिकडे डाळगप्पू नावाचा कुणी साधक आला आहे काय ? हा डाळगप्पू कोण ?"* कल्याण म्हणाले *"स्वामीजी , जीव, शीव, माया, ब्रह्म, सुख-दुःख ही दोन दळं जो गप्प करुन टाकतो सदैव अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू होय.* मात्र ही व्यक्ति माझ्या पाहण्यात आली नाही."
कल्याणस्वामींच्या या उत्तराने सारे शिष्य खजील झाले. आपली चूक त्यांच्या लक्षांत आली, नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दांत सर्वांची हजेरी घेतली व सर्व शिष्यांना सांगितले "उगीच नुसती पारायणे करु नका. दासबोध हे तंत्र आहे त्याचा मंत्र बनवू नका. शांतपणे वाचून अर्थ समजून घ्या. दासबोध जगायला शिका. कोणाची निंदा नालस्ती द्वेष करु नका."
*🍁 श्री 🍁*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"