तुलना करायची घाणेरडी सवय असते प्रत्येकाला. प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असतंच की नाही?? गुलाबाचं फुल डोक्यात घालतात, झेंडूच्या माळा करतात, मोगऱ्याचा गजरा करतात. झेंडूचा गजरा करायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक उपासना आपल्या जागी श्रेष्ठ आहे, पण आपल्या विचारानेच त्याला आपण कमीपणा आणतो. मन हे फार बेइमान असतं बरं. आपलं काम झालं नाही की देवच बदलायचा, हे कुठलं गणित? शेवटी सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात ना??
एकदा समर्थ श्रीरामदास स्वामींकडून ज्याने गुरुमंत्र घेतला होता, असा माणूस श्रीतुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला की, "मला गुरुमंत्र द्यावा." तुकाराम महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं आणि म्हणाले की, "ठीक आहे, पण तू तुझ्या गुरूंना मंत्र परत देऊन ये, मग मी देतो." मग आला हा दिडशहाणा समर्थांकडे आणि म्हणाला की, "मला तुमचा गुरुमंत्र परत करायचा आहे, याच्यात ताकद नाही." समर्थ हसले आणि म्हणाले की, "ठीक आहे. जा आणि चूळ भरून टाक त्या दगडावर." त्यानं तसं करताच त्या दगडावर सुवर्ण अक्षरात गुरुमंत्राची अक्षरे उमटली. मग त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने समर्थांची माफी मागितली.
चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल, तितकाच उशीर होत जाईल, हे विचित्र सत्य आहे. फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते. जितकं मन फळासाठी आतुर, तितकंच ते श्रद्धाहीन असतं.
परमार्थातील एक खूप मोठं सूत्र/ रहस्य सांगतोय आता, ते म्हणजे सोपवणे. तुमच्या हातात जे काही आहे, ते केलंय ना तुम्ही? मग आता सोपवून द्या. कुणावर..? ते महत्वाचे नाहीय, नसतंच. देवावर सोपवा किंवा एखाद्या दगडावर सोपवा, त्यानं काहीच फरक पडत नाही. तुमचं काम सोपवण्यात होतं... कुणावर? हा प्रश्नच नसतो. त्याच्याशी तुम्हाला काय घेणं आहे? सोपवणे म्हणजे काय?? तर निर्धास्त असणं, काळजी सुटणं. आपण फक्त तोंडाने म्हणत असतो की, देवावर सोपवलंय, स्वामींवर सोपवलंय आणि रात्रभर काळजीनं झोप येत नाही. ह्याला सोपवणे म्हणायचं का? आपण काळजी करायची नसते, फक्त घ्यायची असते. आपण काळजी केली की, मग तो नाही करत काळजी. त्याचं काम त्याला करू द्या ना. तुम्ही काळजी करून काही होणार आहे का? होतं का? झालंय का कधी? काळजी वाटणं स्वाभाविकच आहे, ही चुकीची धारणा आधी मनातून काढून टाका. आपणच खांबाला धरून बसायचं आणि खांबच मला सोडत नाही म्हणून रडत बसायचं, याला काय अर्थ आहे?
काळजी सोडली की, 'काळ', पण आपल्यापुढे 'जी', 'जी' करत हाथ जोडून उभा रहातो.
म्हणून तर शिख बांधव म्हणतात ना, "सत् श्री अकाल".
म्हणजे काय... तर जो कालातीत आहे, तोच सत्य आहे.
।। श्रीगुरुदेव दत्त ।।
🌸🌷🌳
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"