Thursday, January 16, 2020

नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले.

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

१७ जानेवारी
   
नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो. नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही. एका इसमाला दुसर्‍या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते.

भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या. भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्‍हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

१७. नामस्मरणाची बुध्दी झाली की आपले काम झाले.

Wednesday, January 1, 2020

नाम सद्‍गुरूकडून घेणे श्रेयस्कर.

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज
२ जानेवारी

नाम सद्‍गुरूकडून घेणे श्रेयस्कर.

नाम सदगुरूकडूनच घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल ? वास्तविक भगवंताचे नाम स्वत:सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे; त्याला दुसर्‍या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून सदगुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वत:च्या पसंतीने घेतलेले नाम ह्यांत फरक करता येत नाही. तरीसुध्दा सदगुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्टय आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तर्‍हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहात नाही. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सदगुरूकडून नाम घेणे जरूर आहे. सदगुरूची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते ? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सदगुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील.

आता अशा रीतीने सदगुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी 'राम राम' असे म्हणत होतोच आणि आता सदगुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले? पण यातच विशेष आहे कारण यात मी कर्ता हा अभिमान टाकावा लागतो. सदगुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव रहात नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते. भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे, म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे, जास्त न करणे, हे त्याचे अनुपान समजावे. औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे.

 साध्या शब्दांचासुध्दा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल