Monday, October 28, 2019

परमेश्वराकडे कर्तेपण देऊन काळजी सोडून द्यावी .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वराकडे  कर्तेपण  देऊन  काळजी  सोडून  द्यावी .*

सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन, आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे, आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे. 

जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करतो आहे, आणि 
आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे, अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी. अशी भावना ठेवायला कुठे बिघडते ? त्यात अवघड ते काय आहे ? 

प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा ; पण तो परमात्माच सर्व करीत असून, त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे, अशी ठाम भावना ठेवली पाहिजे. 
अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली ? 
आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे ! तो काही दुसर्या कुठून मिळवायचा नाही. 
आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते. थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की,
 
मीपण, म्हणजेच कर्तेपण परमात्म्याला द्यावे, म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो, आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे. हेच 'स्वानंदात स्मरण' होय.

आपले कर्तेपण अपुरे आहे. ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे. म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता, ती परमात्म्याला झाली पाहिजे !
 
आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश; आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच 'भगवंत करतो' ही भावना होय. 

आपले होते कसे ते पाहा; कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते; कर्म झाल्यावर शेवटी, 'अरे, हेच का फळ मिळाले ?' म्हणून काळजी लागते; याप्रमाणे,
 
काळजी करणार्या मनुष्याला सुख-समाधान केव्हाच मिळत नाही. काळजी ही वाळवीसारखी आहे; काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे, काळजी आपली निष्ठा कमी करीत असते; त्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. 

काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. 

भारतीय युद्धात, भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे ! अर्जुनाने आपल्या रथाच्या दोर्या भगवंताच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोर्या भगवंताच्या हाती देऊ या. अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते. 
तसे आपण भगवंताचे यंत्र बनू या. यंत्राला चालविणारी शक्ति आणि यंत्राकडून काम करवून घेणारी शक्ति म्हणजे भगवंत आहे. आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहू या.

*३०१ .   आपला  देह  प्रारब्धावर  टाकून,  साधकाने  मजेत  त्याच्या  सुखदुःखाकडे  पाहावे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ ऑक्टोबर  🌸* 

*भगवंताचे  होण्यास  आपण  निर्दोष  असणे  जरूर  आहे .*

भगवंताचे समाधान आपणास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. 

जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी ? 

भगवंताचे होण्यासाठी, आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी, आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. 
आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. 
जगात आपले वागणे असे असावे की, आपल्याविषयी दुसर्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?

भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का ? आपण सर्वजण 'आम्ही भगवंताचे आहोत' असे म्हणतो आणि काळजी करतो, हे किती विपरीत आहे ! 

ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी, प्रपंचातले सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून, ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. 'माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन,' अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. 

खरोखर, वैराग्य, त्याग वगैरेंच्या भानगडीत पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. 

ज्याच्यामधे भगवंताचा विसर पडेल, त्याच्यावर वैराग्य करा.
ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. 

प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या आधीन होऊ नका. आधीन होणे हे पाप आहे, 
प्रपंच करणे हे पाप नाही.
 शक्य तितके धर्माचे पालन करा; नीति प्राणाबरोबर सांभाळा.

 गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता, मला संकोच असा वाटतो की, इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता ? 
काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका, राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही.

*३०३ .   आपल्याला  कोणी  चांगले  म्हटले  तर  आपल्या  जीवाला  धक्का  बसून  लगेच  नामाची  आठवण  व्हावी .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, October 27, 2019

परमेश्वर आपल्या हृदयात आहे .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वर  आपल्या  हृदयात  आहे .*

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; 
त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि 
तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, 

जे जे काही घडतेते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. 

मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. 
याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.

क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! 'काशी', 'गंगा', असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, 
पण तिथल्या राहणार्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. 
क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर 'काशीस जावे नित्य वदावे;' म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्‌भूत होऊन मन पवित्र होईल.

 देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. 

सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का? 

स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि निःस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तिमध्ये नाही तो निःस्वार्थी समजावा. आसक्ति निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. 

देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

*३०२ .  उपासनेचा  हेतू  असेल  तर  तो  राम  आपल्या  पाठीमागे  उभा  आहे  ही  भावना  उत्पन्न  करणे  हा  होय .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, October 23, 2019

परमेश्वराची खरी पूजा .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २४ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वराची  खरी  पूजा .*

देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. 
तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. 
आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, 
चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. 

ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. 
सर्वांभूती भगवद्‌भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. 
पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.

भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले.त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही.

 आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.

'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. 
जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. 
सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. 
चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. 
ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.

*२९८ .   उपाधी  वासना  नाहीशा  करण्यासाठीच  नाम  घ्यायचे  असते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

परमेश्वराची खरी पूजा .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २४ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वराची  खरी  पूजा .*

देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. 
तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. 
आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, 
चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. 

ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. 
सर्वांभूती भगवद्‌भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. 
पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.

भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले.त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही.

 आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.

'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. 
जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. 
सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. 
चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. 
ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.

*२९८ .   उपाधी  वासना  नाहीशा  करण्यासाठीच  नाम  घ्यायचे  असते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Tuesday, October 22, 2019

Monday, October 21, 2019

मुखी नाम , नीतिचे आचरण , हृदयी भगवंताचे प्रेम .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २२ ऑक्टोबर  🌸*

*मुखी  नाम ,  नीतिचे  आचरण ,  हृदयी  भगवंताचे  प्रेम .*

ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास. ज्याच्या हृदयात राम आहे, तो राम म्हणूनच मी पाहतो. 
प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही, तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली. 
प्रपंचाचे आपण मालक बनू या; प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू. जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल ? 

सुख हे लोकांकडून मिळते. समाधान हे अंतर्यामातून मिळते. लोकांकडून येते ते सुख, आतून येते ते समाधान. समाधान दुसर्यावर अवलंबून नसते. ते माझे मला मिळविता आले पाहिजे. समाधान हे देण्यासारखे नाही, आणि घेण्यासारखे नाही.

 माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे, ज्याने परमात्म्याला आपला म्हटला, त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

प्रपंच टाका असे मी कधीच सांगत नाही. प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे. प्रपंच असला पाहिजे असेही नाही. प्रपंच नसला तरी चालेल, आणि असला तरी बिघडत नाही. प्रपंच करा, पण समाधान ठेवा.

मुखाने भगवंताचे नाम, नीतिचे आचरण, आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आई-बापांवर, मुलाबाळांवर, प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे. 

ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या, ते विद्येचे सागर होते, परमात्मस्वरूप होते; पण तुकारामांजवळ काय होते ? तुकारामांजवळ अशी काय विद्या होती ? पण त्यांनी देवावर किती प्रेम केले ! आज लाखो लोक पंढरीला जातात, ही त्याची साक्ष आहे. तसे प्रेम करायला तुम्हा शिका.

 घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल. भाषा गोड असावी, कधी कडू नसावी; लोण्यासारखी असावी. शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे; रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे. भाषा गोड व्हायला आपण निःस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार. 

गोकुळासारखे घर असले तर असू द्या, पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे. गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल खास. 

आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल, तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही. 

चोराने चोरीचा नवस केला, आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टीकरिता नवस केला, काय फरक आहे ? दोघांनाही भगवंत नको आहे ! 

भगवंताचा विसर यासारखे पाप नाही, भगवंताचे स्मरण यासारखे पुण्य नाही. ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्न करूया. नामात राहू या, म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल.

*२९६ .   दुसऱ्यापासून  सुख  मिळविण्याचा  प्रयत्न  करणारा  मनुष्य  प्रपंची  होय .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, October 18, 2019

भगवंताच्या प्राप्तीची साधने

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १८ ऑक्टोबर  🌸* 

*भगवंताच्या  प्राप्तीची  साधने .*

भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे; हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत्प्राप्ती झाली. हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत.

कर्ममार्ग, हठयोग,राजयोग, वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही; उलट क्वचित् प्रसंगी वाढतोही. भक्तिमार्ग सोपा आहे. 

भक्ति म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत् प्रचीती येणे.

अशी भक्ति प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे, आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो.

हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणे, म्हणजेच आपला मान अभिमान, शहाणपण, हे सर्व गुंडाळून ठेवून, गुरु सांगतील तसे, सबब न सांगता वागणे. 

हे ही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याने,सहवासाने, अभिमान हळूहळू कमी होतो.

भक्ति दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते. 
पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून, लंगोटी लावून, 'भगवंता, तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन,' अशा निग्रहाने बसणे. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही.

दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ति उत्पन्न करणे. भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे; असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते. 

विषयाकरिता केलेली भगवद्‌भक्ति ही खरी भक्ति होऊ शकत नाही. भगवत्‌सेवा निष्काम पाहिजे; कारण भक्ति म्हणजे संलग्न होणे. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ति होते, भगवंताची नाही. तेव्हा, आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले; म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसचे भोगणार ? मालक होऊन विषय भोगावेत. 

संत,भगवंत, हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्याइतकेच वेडेपणाचे नव्हे का ? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. 
भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

२९२. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे, नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो, त्याचे साधन बरोबर चाललेले असते.

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, October 17, 2019

सुंदर_बोध कथा

*🥀🥀#सुंदर_बोध*🥀🥀

एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णुला भेटायला गेला. वैकुंठाच्या दारा जवळ ७ कबुतरं होते. त्यातील एका कबुतरा वर यमाची दृष्टी गेली. ते कबुतर खुप घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. 

इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडुन यमाला आत घेतलं. यम विष्णुला भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलवुन गरुडाला विनंती केली. " मला इथुन घेऊन जा साता समुद्रापार , कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातुन कि मला घेऊन जाईल. मला घेऊन चल ." गरुडाला हि त्याची दया आली. गरुडाने मग कबुतराला सातासमुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सुर्याची किरणे पण पोचत नव्हती. ती गुहा दलदलीनी भरलेली होती. 

इकडे यम विष्णुशी बोलुन वैकुंठाच्या दारात आले. त्यानी बघितलं जाताना तर सात कबुतरं होते , आता सहाच कशी काय ? एक कबुतर कुठे गेलं. मग यमानी गरुडाला विचारलं. गरुड म्हणाला , " तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली. ते कबुतर म्हणालं मला सातासमुद्रापार सोड , मी सोडुन आलो. "

ज्या गुहेत गरुडानी कबुतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायु नसल्यामुळे त्याचे प्राण गेले.

यम गरुडाला म्हणाला , " मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो होतो कि हे कबुतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर सातासमुद्रापार जाणार असं विधीलिखित आहे . कसं करायचं ? " पण बघा त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणुन त्याला तशी बुध्दी झाली सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटुन घुसमटुन गेला.

*#तात्पर्य तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले तसेच होणार. आपण त्यात कुठला हि हस्तक्षेप करु*
*शकत नाही. असे जरी असले* *तरी पण जर आपण सदगुरुंचीसेवा व भक्ती केली तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे*

*ॐगुरवे नमा :*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Wednesday, October 9, 2019

भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य !*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ०९ ऑक्टोबर  🌸*

 *भगवंताचे  स्मरण  हेच  भक्तीचे  रहस्य !*

'मी नाही, तू आहेस' हे जाणणे हीच खरी भक्ति होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला, की बाकी सर्वांचा विसर पडतो.
 भक्ति केली की चित्त निर्विषय होते, हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. 

भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तर्हा आहेत. त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू ! भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही ? जग प्रगतीपर आहे हे खरे; पण पैसा, मुले, मान्यता, वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ति ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. 

भगवंतावाचून यश हे अपयशच समजावे. 
कित्येक वेळा अपयश हेच यश बनते; म्हणून अपयश आले तरी, ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत रहावे. 

'भगवंत आहे' असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की, ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचेसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत, आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे. 

खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत, म्हणजे सगुणपरमात्मा, असा आहे की वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. 
आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. 

शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. 

डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुणरूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही.

जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्‌रूपच होणे होय. भगवंताची प्रीति याचेच नाव भक्ति. 

'माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे' असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्वबुद्धी होय. 
आपले स्वतःवर जितके प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना, आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय.

*२८३ .   संकटांचे  डोंगर  अंगावर  पडले  तरी  ज्याची  वृत्ती  भगवंतापासून  वळत  नाही ,  तोच  खरा  भगवंताचा  झाला .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*